पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३६

 अशा दोन प्रकारांनीं हा आरोप येतो. त्यावरून गौण लक्ष्यार्थीत, सारोप आणि साध्यवसान असे दोन भेद झाले आहेत.

 ह्याच लक्ष्यार्थावरून आलंकारिकांनीं दोन पदार्थांचा अभेद दाखविणारा रूपक नांवाचा अलंकार साधला आहे. जसें--

 १. "तुझी आपल्या आयुष्यसरोवरांत, अक्षय सच्चरित्ररूपी पाणी सांठविण्याकरितां, त्या सरोवराच्या सभोंवती, मिताचरणरूपी बांध घाला; ह्मणजे सद्गुणरूपी सुंदर सुंदर कमलें त्या सरोवरांत फुलतील; व त्यास अनिर्वचनीय शोभा येईल; परंतु जर तुझीं मिताचरणानें आपल्या आयुष्यास न बांधलें, तर त्यांतील पाणी सर्व सुकून शेवटीं दुर्गुणरूपी चिखल मात्र त्यांत राहील."

 २. "स्वतंत्रतेची वल्ली, नीतिरूप चांगल्या भूमींत उगवून, धर्मनिष्ठारूप उदकाच्या सिंचनानें, सुशिक्षित लोकांच्या मनोवृक्षावर हळू हळू चढली पाहिजे. अनीतिरूप वाईट भूमींत उगवून, नास्तिकांच्या घाणेरड्या खतानें माजून, अशिक्षित लोकांच्या मनोवृक्षावर चढल्यास, ती त्याचा नाश करून शेवटीं आश्रय नाहींसा झाल्यामुळे आपणही नष्ट होईल."

 ह्यांतील पहिल्या उदाहरणांत आयुष्य ह्या उपमेयाचा 'सरोवर' ह्या उपमानाशीं अभेद कल्पून आयुष्यानें सच्च