पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३३

 याप्रमाणें रूढीवरून होणाऱ्या लक्ष्यार्थाचे चारी प्रकार सांगितले. ह्या लक्ष्यार्थानें भाषेचा बराच मोठा भाग व्यापिला आहे. कोणताही ग्रंथ किंवा सामान्य लेख वाचून पाहिला असतां त्यांत रूढीवरून होणाऱ्या लाक्षणिक अर्थाचे अनेक शब्द आठवतील. अशा प्रकारच्या शब्दांपासून भाषेस फार मोठा उपयोग हा झाला आहे कीं, तिच्यांतील अनेक वाचक शब्दांची उणीव या शब्दांनीं भरून काढिली आहे. याशिवाय जो अर्थ सुचविण्याकरितां अनेक शब्दांचा उपयोग करावा लागतो, तो अर्थ अशा शब्दांपासून थोड्या शब्दांनीं सूचित करितां येतो.

 इंग्रजी साहित्यज्ञांच्या मतें 'आरंभीं' जेव्हां भाषा उत्पन्न झाली तेव्हां, तिच्यांत शब्दसंग्रह थोडा असल्यामुळें एका अर्थाचे शब्द दुसऱ्या अर्थानेंही लोक वापरूं लागले व असें होतां होतां पुढें तेच शब्द तशा प्रसंगीं वापरण्याची रूढी पडून गेली. तें कसेंही असो, पण एवढें मात्र खरें कीं, भाषेत अशा लाक्षणिक शब्दांचा भरणा तिला बाधक न होतां हितकरच झाला.

निमित्तानें होणाऱ्या लक्ष्यार्थाचे भेद.

 ह्या प्रकारांत निमित्त किंवा प्रयोजन जें असतें तें कांहीं गूढार्थ सुचविण्याची वक्तयाची इच्छा हें होय असें पूर्वी आह्मीं सांगितलेंच आहे. या गूढार्थासच व्यंग्यार्थ असें ह्मणतात. व्यंग्यार्थाचें विवेचन पुढें आह्मी करणा-