पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२८

 येथें 'गोऱ्या' व 'काळ्या' ह्या गुणवाचक शब्दांनीं एतदुणवान् जे 'इंग्रज' आणि 'हिंदु’ ह्यांचा बोध होतो.

 याचप्रमाणें जातिवाचक पदानें व्यक्तीचा बोध होणें, व व्यक्तिवाचक पदावरून जातीचा बोध होणें, वगैरे अनेक कारणें आहेत.

 हा शुद्ध लक्ष्यार्थ करते समयीं (१) कधीं तर वाच्यार्थ कायम राहून, त्याशिवाय अधिक अर्थाचा त्यांत समावेश होतो; आणि (२) कधीं वाच्यार्थ अगदीच सुटून जातो. यावरून ह्या दोन प्रकारांस अनुक्रमें, अजहत्वार्थ ( मुख्य अर्थ न सोडणारा ) आणि जहत्वार्थ (मुख्य अर्थ सोडणारा) अशीं नांवें दिली आहेत. ह्यांस उपादानलक्षण असेंही ह्मणतात. ह्यांचीं उदाहरणें.

अजहत्वार्थाचीं.

 १. "खिडकींतून पाणी टाकतांना खालीं मनुष्य पहा."

 येथें 'पहा' या शब्दानें पाहून मनुष्यावर पाणी न पडेल असें टाका, इतका अर्थ सूचित होती.

 २. "आमची गृहस्थिति, स्त्रिया सुशिक्षित झाल्यावांचून सुधरावयाची आशा नाहीं."

 ह्यांत आमच्या शब्दानें 'स्वदेशांतील संपूर्ण लोकांचा बोध होतो.

 ३. "येथें दहीं ठेविलें आहे, कावळा आला तर हाक."


१. मा. मो. पु. पहा.