लोकादिक इतर ग्रंथकार, आणखी निराळ्याच रीतीनें भेद करितात; त्या सर्वांचें विवेचन करणें ह्मणजे एका स्वतंत्र ग्रंथाचा विषय होय. ह्मणून तसें न करितां सर्वांहून अधिक भेद मानणारे जे साहित्यसारकर्ते त्यांच्या ग्रंथास अनुसरून येथें लक्ष्यार्थीचे भेद दाखविले आहेत.
रूढीवरून होणा-या लक्ष्यार्थाचे भेद - रूढी ह्मणजे भाषेंत अनादिसिद्ध होत असलेले प्रयोग. हे दोन प्रकारचे असतात.
१. जेथें एखाद्याच शब्दाचा वाच्यार्थ एक असून त्याची योजना निराळ्याच अर्थानें केली असते तो. जसें--
(१) "हा एवढा मोठा घोडा झाला तरी ह्यास कागद वाचतां येत नाहीं."
(२) "जपाननें रशियाचा पराभव केला."
२. भाषेंत अशीं कांहीं वाक्यें किंवा ह्मणी प्रसिद्ध असतात कीं, त्यांचा वाच्यार्थ एक असून खरा अर्थ निराळाच असतो तो. जसें--
(१) "त्या वेळीं बाजीराव इंग्रजांच्या अगदीं मुठींत होता."
(२) "मी दुसऱ्याच्या ओंजळीनें पाणी पिणारा नव्हें."
रूढीनें होणाऱ्या लक्ष्यार्थाचे १ गौण, २ शुद्ध, ३ विरुद्ध आणि ४ लक्षित असे चार भेद आहेत. त्यांचीं लक्षणें व उदाहरणें.