पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२४

लक्ष्यार्थ असून तो करण्यांत बाळ्यादिकांची निंदा, हा गूढार्थ सुचविण्याचा वक्त्याचा हेतु आहे. लक्ष्यार्थ करितांना, कधीं वाच्यार्थ अगदींच सोडून द्यावा लागतो व कधीं वाच्यार्थ घेऊन त्याशिवाय आणखी ज्यास्त अर्थ घ्यावा लागतो; वरील उदाहरणांत वाच्यार्थ अगदींच सोडून द्यावा लागला आहे. 'रशियानें पामीर घेतलें' ह्या उदाहणांत 'रशिया' शब्दाच्या वाच्यार्थीचा अर्थ विस्तृत करावा लागला. अर्थात् वाच्यार्थाहून अधिक अर्थ घ्यावा लागाला.

 लक्ष्यार्थ भाषेंतील रूढीवरून आणि कांहीं गूढार्थ सुचविण्याच्या निमित्तावरून किंवा प्रयोजनावरून होतो; ह्मणून लक्ष्यार्थाचे १ रूढीनें होणारा व २ निमित्तानें होणारा. असे दोन प्रकार मानिले गेले आहेत. ह्यांचीं लक्षणें व उदाहरणें.

 १. रूढीवरून होणारा लक्ष्यार्थ - भाषेंत अनादि सिद्ध होत असलेल्या प्रयोगावरून जो लक्ष्यार्थ होतो ती. जसें--

 १. "इंग्लंडनें हिंदुस्थानावर स्वारी केली."

 २. "मी रामभाऊच्या घरावरून गेलों."

 हीं वाक्यें भाषेंत अशा प्रकारचें भाषण करण्याची रूढी पडल्यावरून झालीं आहेत.

 २. निमित्तावरून होणारा - भाषेंत गूढार्थ सूचित करण्याचे अपेक्षेवरून जो लक्ष्यार्थ होतो तो. जसें --