पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ३ "माझें घर गंगेवरच आहे."

 ४ "मी रामभाऊच्या घरांवरून गेलों."

 ५ "ही स्त्री सांप्रत विपत्तीनें गाय झाली आहे."

 ६ "इंग्लंडानें हिंदुस्थानावर स्वारी केली."

 ह्या वाक्यांतील पहिल्यांत "मुठींत" "ओंजळीनें पाणी पिणें." दुसऱ्यांत "रत्न" आणि "नाचूं लागणें." तिसऱ्यांत "गंगेवर." चवथ्यांत "घरांवरून." पांचव्यांत "गाय." आणि साहव्यांत "इंग्लंडानें." ह्या शब्दांचे वास्तविक जे वाच्यार्थ आहेत तेच घेतले तर, बाजीरावासारख्या धिप्पाड पुरुषाचें मुठींत राहणें संभवत नाहीं; कोणीही मनुष्य दुसऱ्याच्या ओंजळीनें पाणी पीत नसून येथें पाणी पिण्याचा कांहीं संबंध नाही; गादीवर रत्न असू शकत नाही; दौलतरावासारखे लोक कधीं नाचावयाचे नाहींत; गंगाप्रवाहावर घर कधीं असू शकत नाहीं; घरांवरून जाणें सर्वथा अशक्य आहे; स्त्रीचें गाय होणेंही असंभवनीय आहे आणि "इंग्लंड" हें देशविशेषाचें नांव असल्यामुळे अचेतन देशास स्वारी करणें हा सचेतन प्राण्याचा धर्म संभवत नाहीं.

 अशा रीतीनें वाच्यार्थ बाधित झाले आहेत. यावरून वक्त्याचें तात्पर्य वाच्यार्थीत नाहीं हें उघड दिसतें. यास्तव त्याच्या तात्पर्याकडे दृष्टी देऊन वरील वाक्यांचा अर्थ लाविला असतां वक्त्यास मुठींत शब्दानें 'स्वाधीन असणें;' 'ओंजळीनें पाणी पिणें' या शब्दांनी 'दुसऱ्याच्या सांगण्या-