पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२१

 १ "हल्लीं रशियानें 'पामिर' घेतलें आहे."

 २ "युनिव्हर्सिटींत मराठी भाषा नसावी अशी ज्या महाराष्ट्रीयांनीं संमति दिली ते धन्य खरे."

 ह्या दोन वाक्यांतील पहिल्यांत 'रशिया' ह्या शब्दाचा वाच्यार्थ त्या नांवाचा देश असा आहे. तोच जर घेतला तर देश अचेतन वस्तु असल्यानें त्यास 'पामीर' घेणें, ही चेतन पदार्थाची क्रिया संभवत नाही, ह्मणून तो अर्थ बाधित आहे. ह्याकरितां 'रशिया' शब्दाचा देश विशेषरूप जो वाच्यार्थ तो सोडून 'त्या देशाचा राजा.' असा अर्थ कल्पावा, तेव्हां संगति लागते. या ठिकाणीं 'रशिया' शब्दाचा वाच्यार्थ कांहीं 'तद्देशाचा राजा' नाहीं; तो अर्थ कल्पिलेला आहे. ह्याच कल्पिलेल्या अर्थास लक्ष्यार्थ ह्मणतात.

 आतां ही जी वाक्ययोजना झाली आहे ही भाषेंत तशा प्रकारें भाषण करण्याची रूढी असल्यामुळें झाली आहे. भाषेत असे अनेक प्रकार असतात. जसें–-

 १. 'बाजीराव इंग्रजांच्या मुठींत गेल्यामुळे शिंदे, होळकर वगैरे जोरदार मराठे सरदारांनांही इंग्रजांबरोबर लीनतेनें वागावयास पाहिजे होतें; पण ते दुसऱ्याच्या ओंजळीनें पाणी पीईनात."

 २. "ह्या वेळेस पेशव्यांच्या गादीवर असलेलें रत्न फारच तेजस्वी पडलें त्यामुळे दौलतरावासारखी मंडळी तेव्हांच नाचूं लागली."