पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८

 हे शब्द कसे सिद्ध झाले ह्मणजे ह्या पशूस गायच कां म्हणावें असें जर कोणीं विचारलें तर त्यास ह्या भाषेंत ह्या पशूस गायच नांव आहे, असेंच सांगण्यावांचून दुसरें कांहीं उत्तर देतां यावयाचें नाहीं. सारांश ज्या शब्दास प्रकृति प्रत्ययादिकांचें कांहीं कारण दाखवितां येत नाहीं, असे केवळ रूढीवरूनच बनलेले जे भाषेंतील सिद्ध शब्द तेच रूढ होत.

 २. यौगिक-ज्या शब्दांतील अवयवांवरून तो शब्द अमक्या अर्थाचा वाचक कां हें सांगतां येतें असे शब्द. ज्यांस व्याकरणांत साधित शब्द ह्मणतात ते. जसें -- द्विरेफ़, पयोधर इत्यादि.

 ह्यांत द्विरेफ शब्दाचा भ्रमर आणि पयोधर शब्दाचा मेघ असा अर्थ आहे. हा येौगिक आहे; कारण ज्या नांवांत (भ्रमर या) दोन रकार आहेत तो द्विरेफ आणि उदकास धारण करणारा तो पयोधर असा त्यांचा अवयवार्थ सांगतां येतो.

 ३. मिश्र-अर्धे रूढ व अर्ध यौगिक मिळून जे शब्द बनले असतात ते. जसें - भूरुह, वारिद इत्यादि.

 यांतील भूरुह शब्दांत भू शब्द रूढ असून रुह शब्द यौगिक आहे. त्या दोहोंच्या मिश्रणानें भूरुह शब्द बनला आहे, म्हणून हा मिश्र शब्द होय. ह्याचप्रमाणें पुढील शब्दाचाही प्रकार जाणावा.