आणि ८ सिद्धपदांचें सांनिध्य अशा आठ कारणांनीं होतें असें सांगितलें आहे.
वाच्यार्थांचा बोध करविणारे जे त्या अर्थाचे वाचक शब्द त्यांचे १ जातिवाचक, २ द्रव्यवाचक, ३ गुणवाचक, आणि ४ क्रियावाचक असे चार वर्ग केले आहेत.
१ जातिवाचक-पदार्थीच्या जातीचा बोध करविणारे शब्द; व्याकरणांत ज्यांस सामान्यनामें ह्मणतात तीं. जसें-गाय, घोडा, मनुष्य, पशु, पक्षी, वृक्ष इत्यादि.
२ द्रव्यवाचक-एकाच वस्तूचीं जीं नांवें तीं. किंवा व्याकरणांत ज्यांस विशेषनामें ह्मणतात तीं. जसें-–चंद्र, सूर्य, आकाश, वायु, विष्णु, शंकर इत्यादि.
३ गुणवाचक-पदार्थातील गुण मात्र दाखविणारे शब्द किंवा व्याकरणांत ज्यांस विशेषणें ह्मणतात तीं. जसें-काळा, पिवळा, हिरवा, बरा, वाईट इत्यादि.
४ क्रियावाचक-क्रिया दाखविणारे शब्द. अर्थात् क्रियापदें, जसें-हंसणें, बोलणें, करणें, नेणें, देणें इत्यादि.
ह्याशिवाय वाचक शब्दांचे दुस-या रीतीनें आणखी तीन वर्ग केले आहेत. ते असे, १ रूढ, २ यौगिक आणि ३ मिश्र.
१. रूढ-जो शब्द ज्या अर्थाचा वाचक असतो, तो त्याच अर्थाचा वाचक कां असावा असें ज्याविषयीं कारण सांगतां येत नाहीं ते शब्द. ज्यांस व्याकरणांत सिद्ध शब्द ह्मणतात ते. जसें-गाय, घोडा, बैल, झाड इत्यादि.