पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५

  ८. अविपृष्ट विधेयांश--ज्या वाक्यांत प्रधान जो विधेयांश असती तो पृथक्पणें न सांगतां अप्रधानत्वानें सांगितला असतां, हा दोष होतो. जसें--
 "पदच्युत झालेल्या दिल्लीपती शहाआलमास स्वबाहुबलानें पुनः राज्यपद देवविणाऱ्या महादजी शिंद्यावर असा प्रसंग यावा काय ?”
 ह्या वाक्यांत, ज्यानें दिल्लीच्या बादशहासही राज्यपदावर बसविलें असा महादजी शिंद्याचा पराक्रम विधेय असून तो विशेषणरूपानें वर्णिल्यानें अप्रधान झाला आहे. हें वाक्य असें पाहिजे--"ज्यानें पदच्युत झालेल्या दिल्लीपती शहाआलमास स्वबाहुबलीनें पुनः राज्यपद देवविलें त्या महादजी शिंद्यावर असा प्रसंग यावा काय?"

अर्थसाधन.


 ह्यांत अर्थाचे भेद, अर्थाचे दोष, आणि अर्थाचे गुण ह्या तीन गोष्टींचा समावेश होतो.

अर्थाचे भेद.


 अर्थाचे वाच्यार्थ, लक्ष्यार्थ आणि व्यंग्यार्थ असे तीन भेद आहेत.

वाच्यार्थ.


 जो शब्द ज्या अर्थाचा वाचक असतो, तो अर्थ त्या शब्दाचा वाच्यार्थ होय. किंवा शब्दाचा वास्तविक जो अर्थ तो वाच्यार्थ, असेंही लक्षण करितां येईल. हाच