पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 गुणी व विद्वान् लोक बोलावून त्यांचा आपल्या राज्यांत संग्रह केला, व कोणास कशाही प्रकारचें दुःख असल्याचें जर त्यांच्या कानावर गेलें, तर तें तत्काळ निवारण केल्यावांचून त्यांस चैनच पडत नाहीं." इत्यादि.
 ह्या वाक्यांत सयाजीराव महाराजांच्या कृत्यांचें जें वर्णन केलें आहे, त्या वर्णनास त्यांस आरंभीं जीं विशेपणें दिलीं आहेत तीं शोभण्यासारखीं आहेत.
 ५. समाधि--जेथें एखाद्या पदार्थावर अन्य धर्माचा आरोप केला असतो, तेथें हा गुण होतो. जसें--
 "आजवर या देशांत जो विद्याप्रसार झाला आहे तो इंग्रजसरकारच्या औदार्यबुद्धीनेंच केला आहे. व सरकार कितीही लोभी झालें, तरी ती बुद्धि त्यास आमच्या कल्याणास प्रवृत्त केल्यावांचून राहणार नाहीं.”
 ह्या वाक्यांत 'औदार्यबुद्धि' ह्या अचेतन पदार्थावर, विद्याप्रसार करणें व प्रवृत्त करविणें, ह्या चेतन धर्माचा आरोप केला आहे.

२ वाक्यरचना.

 कर्ता आणि क्रियापद हे दोन असले ह्मणजे वाक्य होते. जसें--
 "रामा जातो. मी बोलतों. " इत्यादि.
 ह्या वाक्यांत, कर्ता आणि क्रियापद, हे दोनच अवयव आहेत. आतां क्रियापद सकर्मक असलें, तर वाक्यांत एक कर्म आणखी अधिक घालावें लागतें. जसें--