पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


रामाचा जसा वशिष्ट, धर्मराजाचा जसा धौम्य, आणि चंद्रगुप्ताचा जसा चाणक्य, तसा त्याचा एक दूरदर्शी, बुद्धिवानू आणि राजनिष्ठ प्रधान होता. त्याच्या अनुमतानें तो सर्व राजकीय कामें करीत असे. त्या योगानें, त्याची कीर्ति चंद्रिकेप्रमाणें सर्वत्र पसरली होती. त्यास त्याच्याच सारखा गुणवान्, सुबाहु नांवाचा एक पुत्र होता. त्यास राजासनीं बसवून आपण वनवास स्वीकारावा अशी त्या राजास इच्छा उत्पन्न झाली." इत्यादि.
 हा प्रसाद गुण सर्व प्रकारच्या लेखनांत उपयोगीं पडतो.
 २.माधुर्य--ज्या शब्दांत, ट, ठ, ड, ढ, ध, रेफयुक्त वर्ण, र्व, र्भ, र्त इत्यादि कणेकटु अक्षरें नसतात, व शब्द समासांत न जोडतां, पृथक् पृथक् योजिले असतात, क्या ठिकाणीं हा गुण उत्पन्न होतो. जर्से-वि-प्र.
 "त्या स्थलापासून सर्व उद्यान दृग्गोचर होत होतें, तेथील दीपसमूह व तत् प्रकाशाच्या योगानें अधिकतर भासणारी जलोद्गार यंत्राची शोभा, अभ्यागत प्रमदा जनांचें इतस्ततः सलील गमन, आनंदानुभवानें उल्हासित अशी त्यांची चित्तवृति, शिशुजनाचे स्वभावानुरूप व्यापार व त्याविषयीं तन्मातृजनाचें कौतुक, जीर्णगात्र अशा वृद्धांची प्रशांत वृति, अशा विचित्र दृग्विषयाचा उपभोग घेण्यांत अल्पकाळ मौजेनें गेला.' इत्यादि.