पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/18

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


असलेले पुरुष कोणत्या वेळेस काय करतील हें सांगवत नाहीं.”
 ह्या वाक्यांत, वक्ता, रामा ह्मणजे स्त्रिया, त्यांच्या ठिकाणीं आसक्त झालेल्या पुरुषांची निंदा करीत आहे, किंवा भगवान् श्रीरामचंद्राच्या ठिकाणीं आसक्त असलेल्या साधुपुरुषांच्या प्रभावाची प्रशंसा करीत आहे, ह्याविषयीं संशयच राहतो. तसेंच--
 "नारायण आणि माधव दोघेही तेथें आले, कांहीं वेळ परस्परांत भाषणें झाल्यानंतर तो ह्यास असें बोलला.”
 ह्या वाक्यांत ‘तो' कोण व ‘हा’ कोण हें समजत नाहीं.
 ४.व्यर्थ--वाक्यांत ज्या शब्दांची जरूर मुळीच नाहीं अशा निरर्थक शब्दांचा उपयोग केला असतां हा दोष होतो. जसें--
 "तिथें जेहेत्ते (जे आहे ते) मी गेलों असतां, तेथला थाटमाट पाहून मन जेहेत्ते प्रसन्न झालें.”
 ह्या वाक्यांत ‘जेहेत्ते' शब्द, किंवा जसें--
 “आजकालचीं मुलें आपल्या स्वार्थाच्या मतलबाच्या कामांत मोठीं हुशार असतात.”
 ह्या वाक्यांत 'स्वार्थाच्या' किंवा ‘मतलबाच्या' ह्या दोहोंपैकीं एक शब्द व्यर्थ आहे.
 ५.अश्लील--अगदीं ग्राम्य, लज्जाकारक, आणि चिळस उत्पन्न करणारे, असे शब्द वापरले असतां हा दोष होतो. जसें--