पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
श्री.


भाषा-सौंदर्य-शास्त्र.


 सैौंदर्य ह्मणजे शोभा आणि शास्त्र ह्मणजे नियम. ह्मणून भाषेला शोभा आणणारे नियम ज्यांत असतात, तें भाषा-सौंदर्य-शास्त्र होय.
 हें शिकल्यानें भाषा मनोरम बोलतां व लिहितां येते. व तशी ती असली, ह्मणजे तींत व्यक्त केलेला आशय, दुस-याच्या मनांत चांगला व लवकर ठसतो.
 संस्कृतांतल्या भाषासौंदर्यशास्त्रांत मुख्यत्वेंकरून शब्द, वाक्य, अर्थ, रस, अलंकार. आणि भाषासरणि इतक्या गोष्टींचा विचार केलेला असतो; ह्मणून या ग्रंथांतही शब्दयोजना, वाक्यरचना, अर्थसाधन, रसविचार, अलंकारविचारआणि भाषासरणि असे सहा विभाग करून त्यांचें संक्षेपानें विवेचन केलें आहे.

१ शब्दयोजना.

 कांहीं अर्थबोध होतो त्या ध्वनीस शब्द ह्मणतात. मग त्याचीं अक्षरें कितीही असोत.
 शब्दापासून वाक्य होतें, वाक्यापासून अर्थ उत्पन्न होतो, अर्थापासून रस व अलंकारादिक साहित्यें सिद्ध होतात. ह्मणजे ह्या सर्वांस, शब्द, हे मूळ कारण होत. ह्मणून त्यांचा विचार, प्रथम केला आहे.