पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७५

धृति, हर्ष, निर्वेद, भूतदया इत्यादि व्यभिचारीभाव. उदाहरण-- "ह्या मनाच्या शांतीकरितां किती जरी यत्न केला, तरी तो वृथा आहे. मोठमोठे राजे आपल्या वासना पूर्ण करण्याकरितां कोट्यवधि रुपये खर्च करून थकले. तथापि पुनः मनांत कांहीं तरी वासना राहिल्याच. बरें, भगवद्भजन करूं म्हटलें तर तत्प्राप्ति व तद्दर्शनाची इच्छा, ही तरी वासना आहेच; व जेथें वासना आहे, तेथें निःसंशय क्लेश आहेत. म्हणून या सर्व ऐहिक व पारमार्थिक गोष्टींचा मी आतां त्याग करणार, व अगदीं निरिच्छ होऊन बसणार; बसणार तरी कशास? प्रवाहपतित काष्ठाप्रमाणें यदृच्छेनें जें जें घडेल तें तें घडो. आपली मानसिक प्रवृत्ति व वासना ह्यांचा मात्र त्यास संपर्क लागूं देणार नाहीं. पण हें म्हणावयाचें तरी कारण काय? कांचेवरील हिऱ्याचा भ्रम नाहींसा झाल्यावर त्यास कोण आवरणार? तद्वत् गुरुकृपेनें ह्या संसारावरील सत्यत्वाचा माझा भ्रम नष्ट झाला. आतां प्रवृत्ति होतेच कशी."

 ह्यांत ‘संसार' हा वैराग्य नामक चित्तवृत्तीचा आलंबन विभाव असून त्याचें मिथ्यात्वज्ञान उद्दीपक कारण आहे; व मति, धृति इत्यादि संचारी सहायक असून सर्वसंगपरित्याग करणें हा अनुभव आहे.

 येणेंप्रमाणें नऊ रस व त्यांचीं उदाहरणें सांगितलीं. रसाचा पूर्ण उत्कर्ष जसा मोठ्या प्रबंधांत किंवा विस्तृत ग्रंथांत दिसतो व अनुभवास येतो, तसा अल्पशा उदाहरणांत