पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/१११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९२

 १. "ह्या त्याच्या ललिततम व मधुरतर वचनरचनेच्या योगानें संनिध असलेला तो प्रमदाजन त्या सुकुमार राजकुमाराशीं मनोविनोद करण्यास्तव अत्यंत आतुर झाला. परंतु राजकुमाराचा परिचारकगण त्या कुमारास घेऊन समीपतरवर्ति एका निर्मलजलपूर्ण व रमणीय अशा सरोवराकडे गेला; त्यासमवेत, निम्नभूभागीं जशी तरंगिणी वळते तसा तो प्रमदाजनाचा समूहही तिकडेसच वळला.”

 ह्यांत मृदु शब्दांचीच योजना केली आहे. आणखी जसें --

 २. “त्या दुष्टाचा उद्दामपणा अद्यापही कमी होत नाहीं, तर मी त्याची खोड मोडून, त्याचें नांव देखील नष्ट केल्यावांचून राहणार नाहीं. अरे मूढा! माझ्या समोर इतका उन्मत्त व मस्त झालास काय? हीं बंडें, हा दांडगेपणा, अशी बेशरमी हीं माझ्या पुढें अगदीं चालावयाचीं नाहींत. ह्या बलाढ्य बाहुदंडाच्या जर का तूं सपाट्यांत सांपडलास तर तुझ्या देहाचे मोहरीएवढे खंड खंडच होतील. उद्धटपणाचा व लुच्चेगिरीचा शेवट असाच व्हावयाचा व तो झालाच पाहिजे.”

  ह्यांत कठोरवर्णयुक्त शब्दांची रचना आहे; आणखी जसें --

 ३. “विषयवासनेचा संकोच, जनसंसर्गाविषयीं अनभिरुचि, एकांतनिवासाविषयीं औत्सुक्य, परमात्मपदचिंतनाविषयीं आसक्ति आणि सर्व ऐहिक सुखाविषयींची उपरति हीं साधु पुरुषांचीं बाह्यलक्षणें होत."

 ह्या वाक्यांत जे शब्द आले आहेत ते प्रौढ आहेत.