पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/१०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८८

त्या गरीबांचे दुःख सहन न झाल्यानें, त्यांनी सरकारास अर्ज करून कायदा करून घेतला. केवढी ही भूतदया!”

 ह्यांत भूतदयेच्या संबंधानें जरी मॅंचेस्टरच्या व्यापारी लोकांची स्तुति केली आहे तरी वक्त्याचा अभिप्राय स्तुति करण्याचा नसून इतक्या क्षुल्लक गोष्टीनें देखील हिंदुस्थानच्या व्यापारास हरकत होईल असें करण्यांत मॅंचेस्टरचे व्यापारी तत्पर असतात अशी निंदा करावयाचा आहे.

 वरून निंदा व आंतून स्तुति असें वर्णन असलें तरीही हाच अलंकार होतो.

स्वभावोक्ति.

 पदार्थाच्या गुणधर्मांचें यथार्थवर्णन जेथें येतें तेथें स्वभावोक्ति अलंकार होतो. जसें—

 "त्या बाईस एक वर्षभराचा मुलगा होता. माझ्या समोर ती त्यास जेवावयास घेऊन बसे, तेव्हां त्या मुलानें मोठी मौज करावी. बाईनें लहानसा घांस हातांत तयार केला कीं, तो डबीसारखें आपलें तोंड उघडून तिच्या पुढे नेई. व तिनें तोंडांत घांस घालतांच तोंड मिटून घेऊन दोन्ही हातांनीं टाळ्या वाजवी; तशांत जर एखादा वाद्यादिकांचा ध्वनि ऐकूं आला तर रांगत रांगत खिडकीजवळ जाई. ती पाणी पाजूं लागली तर पात्रांत तोंडाच्या फुंकेनें पाण्याचे बुडबुडे उत्पन्न करी.” इत्यादि.

 यांत मुलाच्या स्वभावाचें वर्णन आहे.