पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२८
भारतीय लोकसत्ता

आपण कशी पारखून घेतली पाहिजे, याची कल्पना यावी म्हणून मॅक आयव्हरचें हें विवेचन येथें उद्धृत केले आहे. असो. (मॅक आयव्हर, मॉडर्न स्टेट. पृ. ७२ ते ७४)
 प्राचीन भारतांतील गणराज्यांच्या अंतरंगाची येथवर चिकित्सा केली. आणि ग्रीस व रोम येथे लोकसत्तेचा उदय झाला असे ज्या अर्थाने म्हणतां येते त्या अर्थाने भारताविषयीं म्हणतां येत नाहीं, असा निष्कर्ष आपण काढला. पण असे असले तरी भारतांतील या गणराज्यांचे विद्वानांनी गायिलेले वैभव अगदीं अनाठायीं होते असेहि, दुसऱ्या टोकाला जाऊन एकांतिक विधान मला करावयाचे नाहीं. लोकशाही हा इतका उज्ज्वल व उदात्त धर्म आहे कीं, 'स्वल्पमप्यस्यधर्मस्य त्रायते महतो भयात्' । हे वचन त्याविषयीं अगदी सार्थ आहे. म्हणूनच त्या दृष्टीने अगदी अल्प जरी मार्गक्रमण झाले असले तरी ते अभिनंदनीयच आहे. कोणच्याहि समाजाला त्याचा अभिमान वाटावा असाच तो विक्रम आहे. तेव्हां तसा योग्य तो अभिमान भारताला या गणराज्यांच्याविषयीं वाटणे अवश्यच आहे; आणि हा अभिमान मागल्याकाळी येथे जगांतली एक महनीय कल्पना उदयास येऊन गेली होती असे समाधान मानण्यापुरताच नसून त्या महनीय कल्पनेच्या उदयाचें फलहि भारतास मिळाले होते, असेहि इतिहासावरून दिसून येईल.

व्यक्तित्व आणि कर्तृत्व

 व्यक्तीचे मन, बुद्धि, भावना, श्रद्धा व एकंदर कर्तृत्व यांच्या विकासाला पूर्ण अवसर ज्या समाजव्यवस्थेत मिळतो, ती समाजव्यवस्था खरीखुरी लोकायत्त होय. या दृष्टीने पहातां हिंदुस्थानांत प्राचीन काळी तत्त्वज्ञान व धर्म या क्षेत्रांत आणि विद्या व कला यांच्या क्षेत्रांत लोकांना विचार, उच्चार व आचार यांचे जवळजवळ अनिर्बंध स्वातंत्र्य मिळत असल्यामुळे तेवढ्यापुरती येथली व्यवस्था लोकायत्त होती असे म्हणण्यास हरकत नाहीं. असें स्वातंत्र्य असल्यामुळेच या भूमीत सांख्य, वेदान्त, न्याय, मीमांसा इत्यादि पंथांनीं अतुल असें विचारवैभव निर्माण केले. हे स्वातंत्र्य असल्यामुळेच येथे हिंदुधर्म, बौद्धधर्म, जैनधर्म इत्यादि विविध धर्म व अनेक पंथ उदय पावून शेजारी राहून पुष्कळ अंशी आविरोधानें आपला विकास करून घेऊ