पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२३
प्राचीन भारतांतील लोकसत्ता

वरचेवर लढे होत गेले; त्यामुळे बहुजनांना ट्रिब्यून हे सर्वात मोठे अधिकारी आपल्यांतून नेमण्याचा हक्क प्राप्त झाला. इ. स. पू. ४४५ मध्ये तर वरिष्ठजन व बहुजन यांच्यांतील मिश्रविवाहाला कायद्यानें मान्यता देण्यांत येऊन जन्मसिद्ध उच्चनीचता समूळ नष्ट करण्यांत आली. इ. स. पू. ३६७ साली कॉन्सलच्या जागेवर नेमले जाण्याचा महत्त्वाचा हक्कहि प्लीबियन लोकांना मिळाला. या तऱ्हेचा हा संघर्ष रोमन लोकसत्ताकाच्या अंतापर्यंत चालू होता, आणि सत्तेचा वांटा, जमिनीचा वांटा व धनाचा वांटा ही त्यांची मुख्य कारणे होतीं. अथेन्समध्येहि सोलन पासून रोमन आक्रमणापर्यंत म्हणजे ख्रिस्तपूर्व ७ व्या शतकापासून तिसऱ्या शतकापर्यंत खानदानी सत्ता व सामान्य जन यांच्यांत सत्ता संपादनासाठीं अखंड संग्राम चालू होता. त्यामुळेच तेथे 'कसेल त्याची जमीन व लोकाधीन सरकार' या सिद्ध गोष्टी होऊन गेल्या होत्या. सत्तासंपादनासाठी व प्रस्थापित शासनावर नियंत्रण ठेवण्यासाठीं अखंड संग्राम करणे हा लोकशाही जीवनांतील पहिला घटक होय; यामुळेच लोकशाही या शब्दाला अर्थ निर्माण होतो. भारतांत लोकांनी, नागरिकांनी अशी जागरूकता ठेवून सत्ताधिष्ठित वर्ग मदमत्त होतांच त्याच्याशी संग्राम करून त्याला वेसण घातल्याचे एकहि उदाहरण नाहीं. येथील जनता अशी जागरूक नसेच. राजसत्तेविषयीं ती सर्वस्वी उदासीन असे, असे इतिहास सांगतो आणि दुर्दैव असे की ही गोष्ट भूषणावह होती, हेच भारताच्या ग्रामव्यवस्थेचे वैभव होते, असे अलीकडे मानले जाते. तें कसेंहि असो. ग्रीस- रोममधील जनता जमिनींसाठीं, सुखसाधनांसाठीं, संधिसमानतेसाठीं, अधिकारासाठीं, व राजकीय हक्कासाठी ज्याप्रमाणें सारखी संग्राम करावयास सज्ज होती तशी भारतीय जनता कधींहि नव्हती. येथे अशा तऱ्हेचा संग्राम करावा ही जाणीव, ही प्रबुद्धता कोणच्याहि वर्गात कधींहि निर्माण झालेली नव्हती. ब्राह्मण व क्षत्रिय हे सत्ताधारी वर्गातले खरे; पण त्या वर्गातहि अनेक लोक दरिद्री व दीन होते. सत्ताधारी अधिकाऱ्यांकडून त्यांचाहि अनेक वेळां छळ झालेला आहे. तरी अशा तऱ्हेच्या राजकीय हक्कासाठीं संग्राम करण्याची बुद्धि त्यांच्याहि ठायीं कधीं उदित झाली नाहीं. चातुर्वर्ण्याचा, जातिव्यवस्थेतील उच्चनीचतेचा व इतर विषमतेचा अन्याय ब्राह्मण क्षत्रियांपैकींहि अनेकांना जाणवत असल्याचीं