पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

समावेश होता, दुसऱ्या कोणत्याही गौण वनोपजाचा, रानच्या मेव्याचा उल्लेख नव्हता. एकूण वनबंदोबस्ताची प्रक्रिया खूपच असमाधानकारक होती. उदाहरणार्थ, सोलापूरच्या अठराशे ऐशीच्या सुमाराला लिहलेल्या गॅझेटियरमध्ये उल्लेख आहे की तिथे जंगलाचे आरक्षण केले तेव्हा मोठे अवर्षण पडले होते, आणि अनेक लोक पोट भरण्यासाठी शेती सोडून गेले होते. त्यांच्या शेतजमिनीही जंगलात समाविष्ट करण्यात आल्या. यातून प्रचंड असंतोष निर्माण झाला.

अठराशे त्र्याऐशी साली महात्मा जोतिबा फुल्यांनी यातून निर्माण झालेल्या आपत्तीचे रेखीव वर्णन केले आहेः “पूर्वी ज्या शेतकऱ्याजवळ फारच थोडी शेते असत व ज्याचा आपले शेतीवर निर्वाह होत नसे, ते आसपासचे डोंगरावरील दऱ्याखोऱ्यांतील जंगलांतून उंबर, जांभूळ वगैरे झाडांची फळे खाऊन व पळस, मोहा इत्यादी झाडांची फुले, पाने आणि जंगलांतून तोडून आणलेल्या लाकूडफाट्या विकून, पैपासोडीपुरता पैसा जमा करत व गांवचे गायरानाचे भिस्तीवर आपल्याजवळ एक दोन गाया व दोनचार शेरड्या पाळून त्यांच्यावर जेमतेम गुजारा करून मोठ्या आनंदाने आप-आपल्या गांवीच रहात असत. परंतु आमचे माय बाप सरकारचे कारस्थानी युरोपियन कामगारांनी आपली विलायती अष्टपैलू अकल सर्व खर्ची घालोन भले मोठे टोलेजंग जंगलखाते नवीनच उपस्थित करून, त्यामध्ये एकंदर सर्व पर्वत, डोंगर, टेकड्या, दरीखोरी व त्याचे भरीस पडीत जमिनी व गायराने घालून फ़ारेस्ट खाते शिखरास नेल्यामुळे दीनदुबळ्या पंगु शेतकऱ्याचे शेरडाकरडांस या पृथ्वीचे पाठीवर रानचा वारा सुद्धा खाण्यापुरती जागा उरली नाही.” अशा धोरणांविरुद्ध तंट्या भिल्ल आणि बिरसा मुंडांसारख्या आदिवासी पुढाऱ्यांच्या नेतृत्वाखाली एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस उठावही झाले.

निसर्गसंगोपनाच्या परंपरा 

अशी सरकारी मालकी प्रस्थापित केल्यावर त्याचे समर्थन करणे अत्यावश्यक होते. एकूणच भारतीय समाजाच्या सर्व चाली-रीती टाकाऊ आहेत, हे लोक अदूरदृष्टी आहेत, भारतीयांना स्वतःच्या मूर्खपणापासून वाचवायला आम्ही अवतरलो आहोत असा आव अगदी सुरवातीपासून इंग्रजांनी आणला. वनाधिकाऱ्यांच्या कर्तव्यांची यादी करताना म्हटले: “लोकांना दूरदृष्टी नाही. ते जंगलाची निष्कारण नासाडी करतात. त्यांना स्वतःच्या अविचारीपणापासून वाचवणे हेच वनाधिकाऱ्यांचे मुख्य कर्तव्य आहे!” अर्थात् याच इंग्रजांनी स्वतःच्या देशातल्या जंगलांचा नायनाट केला होता हे ते सोयीस्करपणे विसरून गेले होते. ब्रिटिश पूर्व काळात स्थानिक लोकांच्या निसर्गसंसाधनांचा जोपासनेच्या नानाविध संस्था कार्यरत होत्या. यातल्या तलावांच्या व्यवस्थापनाच्या अनेक संस्था सिंचनाखालील शेत जमिनीतून जास्त सारा वसूल होतो म्हणून इंग्रजी आमदानीत शाबूत ठेवल्या गेल्या. त्या कोसळल्या स्वातंत्र्यानंतर; त्यामुळे त्यांबद्दल खूप व्यवस्थित माहिती उपलब्ध आहे, आणि ह्यातील अनेक अत्यंत कार्यक्षम होत्या हे आता सर्वमान्य झालेले आहे. परंतु