पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/114

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

या सामूहिक वन क्षेत्राची सीमा दर्शविणारा नकाशा किंवा आरेखन जोडण्याची आवश्यकता आहे. यासाठी शासनाकडून मिळवलेल्या नकाशांचा आधार घेऊन आपल्या वतीने एक नकाशा अथवा आरेखन बनवावे. सामूहिक वनभूमीच्या मर्यादेत कोणत्याही प्रकारची वनजमीन, राखीव जंगले, अभयारण्ये, राष्ट्रीय उद्यानांचा भागसुध्दा समाविष्ट असू शकेल हे लक्षात ठेवावे. ह्या अधिकृत उद्दिष्टासाठी बनवलेल्या नकाशात सर्वे/कंपार्टमेट नंबर दाखवावे लागतील. या जोडीला गावसमाजाच्या नियोजनाच्या कामासाठी आणखी एक नकाशा बनवावा. या नकाशावर लोकांबरोबर बसून लोकांच्यात रूढ असलेली स्थल नावे पण वापरावी. असे सहभागाने नकाशे बनविण्यात लोक निश्चितच उत्साहाने भाग घेतात. पुढील पानावर मेलघाट परिसरातील कोरडा गावाचा असा एक स्थानिक स्थल नावे दर्शविणारा नकाशा दिला आहे.

  • अभ्यास गट जुळवणे [तक्ता २ - अभ्यास गट] ग्राम जैवविविधता समितीच्या देखरेखीखाली माहिती संकलन, आणि तिच्या आधारे व्यवस्थापन योजना व कृति आराखडा बनविण्याचे काम एका अभ्यास गटातर्फे करणे सयुक्तिक ठरेल. अशा अभ्यास गटात स्थानिक विद्यार्थी, शिक्षक, स्वसहाय्य गट व इतर स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते, तसेच निसर्गाशी जवळीक असलेले वैदू, गुराखी, मासेमार इत्यादि उत्साही, जाणकार ग्रामस्थ हे सर्व असू शकतील. या सर्वांची नावे, पत्ते, लिंग, वय, फोटो, ही माहिती संकलित करावी. शिवाय प्रत्येकाने दिलेल्या योगदानाचा तपशील असावा. ग्राम जैवविविधता समितीचे माहिती संकलनाचे काम निरनिराळ्या पद्धतीचे असू शकेल. (१) प्रत्यक्ष निरीक्षणातून माहिती गोळा करणे, उदा. विद्यार्थी रानांत पाहणी करून मोहाच्या झाडांच्या संख्येचा अथवा सरपणाच्या उपलब्धतेचा अंदाज बांधतील. (२) आपल्या अनुभवाच्या आधारे माहिती पुरवणे. उदा. जाणकार मासेमार नदीत माशांच्या वेगवेगळ्या जातींच्या उपलब्धतेत काय काय बदल झाले आहेत हे सांगतील. (३) जाणकारांच्या मुलाखतीद्वारे माहितीनोंदवणे. (४) कागदपत्राच्या आधारे माहिती नोंदवणे, उदा. गावातील कोणती कोणती कुटुंबे दारिद्य रेषेच्या खाली आहेत, अथवा वनविभागाच्या लिलावांत शिकेकाई गोळा करण्याचा हक्क किती पैसे भरून घेतला गेला अशा पद्धतीची नोंद. (५) जीवजातींची शास्त्रीय नावे पुरवणे. शक्य झाल्यास तज्ञ स्थानिक जीवजातींची शास्त्रीय नांवे पुरवतील (६) इतरांनी गोळा केलेली माहिती तक्त्यात (अथवा शक्य झाल्यास पुढे मागे संगणकीय डेटाबेसमध्ये) भरणे, आणि (७) माहिती पडताळून पाहणे, एकूण कामाला मार्गदर्शन करणे, समन्वय करणे. अभ्यास गटाचा प्रत्येक सदस्य यातील कोणकोणत्या प्रकारच्या एक किंवा अनेक कामात सहभागी आहे, आणि कोणत्या कालावधीत त्याने ही भूमिका बजावली हे नोंदवावे. | अभ्यास गटाची माहिती ह्या दुस-या तक्त्यात भरावी. ह्यात अभ्यास गटातील प्रत्येक व्यक्तीच्या अभ्यास प्रक्रियेतल्या (एक किंवा अनेक) भूमिका स्पष्ट कराव्या.