पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/95

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आज आम्ही सरकारला सांगतो आहोत की इतके दिवस आम्ही हे सहन करत आलो. त्या काळात नेहरूप्रणीत व्यवस्था होती. सार्वजनिक काम कोणतं, जमिनीची किमत किती हे सरकारनं ठरवायंच, असं त्या व्यवस्थेत होतं; पण आता पंतप्रधानांनी वॉशिंग्टनला जाऊन स्वतः कबूल केलं आहे की ती नेहरूव्यवस्था संपली, समाजवाद संपला, नियोजन व्यवस्था संपली, खुल्या बाजारपेठेची व्यवस्था अमलात येत आहे.
 मग, आमच्या शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की डॉ. आंबेडकरांच्या घटनेत शेतकऱ्यांना विरोध करण्याकरिता म्हणून ज्या ज्या काही दुरुस्त्या केल्या आहेत त्या सगळ्या रद्द करा, शेड्युल नऊ रद्द करा. शेतकऱ्याची जमीन घ्यायची असेल तर ती बाजारभावाने आणि शेतकऱ्याने स्वखुशीने दिली तरच घेता येईल. शेतकऱ्याची इच्छा नसतानासुद्धा त्याची जमीन सरकारला घेण्याचा अधिकार फक्त एकाच बावीत असू शकतो आणि ती बाब म्हणजे लष्कराची गरज ; पण कुणाला कारखाना काढायचा आहे, कुणाला दुकान काढायचं आहे, कुणाला राहायला जागा हवी याकरिता तुम्ही शेतकऱ्याला निर्वासित करू शकत नाही. हे खुल्या अथव्यवस्थेत चालणार नाही.

 आजपर्यंत शेतीमालाच्या भावाचं आंदोलन शेतकरी संघटनेने केलं. खुल्या अर्थव्यवस्थेमध्ये आजही आंदोलन करतो आहोत की शेतकऱ्यांच्या मालावर तुम्ही बंधनं घालू नका, त्याच्या वाहतुकीवर बंधन घालू नका, निर्यातीवर बंधन घालू नका. खुल्या व्यवस्थेत हे चालणार नाही. तसंच आमची जमीन तुम्हाला घ्यायची वेळ आली तर ती काय भावानं द्यायची हे आम्ही ठरवू. 'आमची जमीन, आमचा भाव' हे आंदोलन आम्ही देशभर करायचं ठरवल आहे. हा काही चिखली-कुदळवाडी प्राधिकरण-श्रीनिवास पाटील.... असा स्थानिक प्रश्न नाही. शेतीमालाच्या भावाचा प्रश्न देशभरच्या शेतकऱ्यांनी लढवला आणि जिंकला. आम्ही फक्त कांद्याचं आंदोलन करीत बसलो नाही म्हणून पंजाबच्या गहू उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी महाराष्ट्रातील शेतकरीही लढले. शेतीमालाच्या भावासाठी केरळपासून पंजाब-हरिणापर्यंतचे शेतकरी लढले तेव्हा ही लढाई जिंकली. आता 'शेतीच्या भावा'चा हा लढा चिखलीपुरता मर्यादित राहून चालणार नाही. दरोडेखारांची मोठी टोळी आहे. तिचा .मुख्य दिल्लीला आहे. छोटा मुख्य मुंबईला आहे. आपण जर असे म्हणालो की माझ्या घरावर दरोडा पडला आहे तेवढ्यात दरोडेखोराला मी हुसकून लावीन तर चालणार नाही. तो पुन्हा आपल्या साथीदारांना घेऊन दरोडा घालायला

बळिचे राज्य येणार आहे / ९७