Jump to content

पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/93

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


नेहरूव्यवस्था संपली,

शेतकऱ्यांचा दुष्टावा सोडून द्या



 गेली दहा बारा वर्षे हिंदुस्थानातला शेतकरी सरकारशी लढत आला आहे. दहा वर्षांपूर्वी आम्ही जेव्हा म्हणालो की, 'शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे' तेव्हा पुढारी म्हणायच "ही काय मागणी आहे? त्यापेक्षा पाणी मागा, धरण मागा, कालवे मागा, साखर कारखाना मागा, बँक मागा..." आम्ही म्हटलं, असलं काही नको. आम्हाला शेतीमालाचा भाव फक्त पाहिजे. म्हणजे, शेतीमालाला भाव मिळणार नाही असं काही तुम्ही करू नका.
 नेहरूव्यवस्था आम्हाला नको हे दहा वर्षांपूर्वी आम्ही म्हटलं. त्यावेळी सगळेच नेहरूवादी होते आणि गेल्या दहा वर्षांत शेतकऱ्यांनी एवढी मोठी लढाई जिंकून दाखविली की पंतप्रधानांना आज कबूल करावं लागतं की, "नेहरूव्यवस्था संपली, खुल्या अर्थव्यवस्थेकडे आम्ही जाऊ इच्छितो. पुन्हा नेहरूव्यवस्थेची जुनी चूक आम्ही करणार नाही."
 शेतकरी सरकारविरुद्ध लढायला घाबरत नाही
 चिखली परिसरातील जमिनींच्या संपादनाची ही समस्या १९६८ पासून सुरू झाली; पण शेतकऱ्यांवर डल्ला मारण्याच्या या कारवाईचा इतिहास त्याहून जुना आहे.

 शासन शेतकऱ्याची जमीन संपादन का करू शकते? १९५० मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला घटना दिली. त्या घटनेमध्ये प्रत्येक माणसाला स्वातंत्र्य दिलं, विचाराचं स्वातंत्र्य दिलं, उच्चाराचं स्वातंत्र्य दिलं, आपापला व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य दिलं. त्या घटनेमध्ये असं म्हटलं होतं की कुणाचीही मालमत्ता सरकार ताब्यात घेऊ शकणार नाही. कारण ज्याला त्याला

बळिचे राज्य येणार आहे / ९५