पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/9

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पद्धतीची कारखानदारी सुरू झाली तेव्हा शेतीतून तयार होणारी बचत कशी वापरावी यावर ऊहापोह झाला होता. रशियामध्ये समाजवादी औद्योगिकीकरणाची क्रांती झाली तेव्हाही तशाच तऱ्हेने वादविवाद झाला. रशियामधील या वादविवादाला काही वेगळं महत्त्व आहे. रशिया स्वतःला मार्क्सवादी देश म्हणवत होता. आणि मार्क्स ने स्वच्छ पणे सांगितलं आहे की औद्योगिकीकरणाकरिता लागणारं भांडवल हे कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या, श्रमिकांच्या शोषणातून तयार होतं. शेतीचा भांडवलनिर्मितीशी काही संबंध नाही. शेती ही अडाणी, प्राचीन (Primititive) अवस्था आहे आणि अशा अडाणी क्षेत्रातून भांडवल निर्मिती होऊच शकत नाही. त्यामुळे कामगारांच्या शोषणातून तयार होणारी ही बचत कामगाराच्या हाती ठेवली तरच भांडवलशाही औद्योगिकीकरण देशांपेक्षा अधिक वेगाने होऊ शकेल आणि समाजवादी औद्योगिकीकरणही होऊ शकेल. कामगारांच्या शोषणातूनच भांडवल निर्मिती होते असं आग्रहाने मांडणाऱ्या मार्क्सने आणि मार्क्सवाद्यांनी, कारखानदारी उभी राहिल्याशिवाय कामगार होत नाही आणि कारखानदारीसाठी जे भांडवल लागतं ते कामगारांशिवाय कुठून आणले असेल या प्रश्नाकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले.

 तर अशा या मार्क्सवादी रशियामध्ये जेव्हा समाजवादी औद्योगिक क्रांती झाली तेव्हा बुखारीन आणि प्रियाब्रेझेन्स्कीचं या दोन अर्थशास्त्रज्ञांमध्ये मोठा वादविवाद लेखी स्वरूपात झाला. प्रियाब्रेझेन्स्कीचं असं म्हणणं होतं की कोणत्याही औद्योगिकीकरणाचा पाया हा शेतीच्या शोषणातच असतो आणि रशियामध्ये जर औद्योगिक क्रांती व्हायची असेल तर शेतीचं शोषण होणं आवश्यकच आहे; पण समाजवादी देशामध्ये, शेतकऱ्यांचं शोषण करावं असं म्हणणं तसं कठीणचं आहे. पण रशियामध्ये त्यावेळी जमीनदारी पद्धत होती. बड्या जमीनदारांना लेनिनने 'कुलक' असा शब्द वापरला होता. तेव्हा शेतीवर हा जो हल्ला झाला तो शेतकऱ्यांवर, शेतावर काम करणाऱ्या कुळांवर न करता या 'कुलका'वर करण्यात आला. या दोघा अर्थशास्त्रज्ञांचा जाहीर वादविवाद होत होता; पण राज्यकर्त्यांना, शेतकऱ्यांना पिळलं पाहिजे, लुटलं पाहिजे असं म्हणणं थोडंच परवडणार आहे? त्यांना निदान म्हणताना, कागदोपत्री, जाहीर सभांतून शेतकरी हा देशाचं कल्याण करणारा आहे, शेतकरी सुखी तर जग सुखी अशीच वाक्यं वापरावी लागतात. मग प्रत्यक्ष अवलंबिलं जाणारं धोरण वेगळं का असेना! राज्यकर्त्या कम्युनिस्ट पक्षाच्या

बळिचे राज्य येणार आहे / ११