पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/57

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 लंगडे समर्थन
 सरकारचे डोके कसे चालले आहे हे समजणे खरेच कठीण आहे. या प्रश्नावर पूर्वीच्या काळीही शेतकीमंत्र्यांनी मोठी विदूषकी उत्तरे दिली आहेत. अमेरिकेतील शेतकऱ्याला जास्त भाव का, असा प्रश्न लोकसभेत आला असता राव वीरेंद्रसिंगांनी उत्तर दिले, "अमेरिकेत आम्ही नेहमीनेहमी थोडीच खरेदी करतो? तेव्हा एखाद्या वर्षी खरेदी करावी लागली तर तेवढ्यापुरते जास्त भाव देणे योग्यच आहे ." या उत्तरात सगळात विदूषकीपणा नाही, काही खोल अर्थ आहे. अन्नसचिवांनी हाच मुद्दा मांडला आहे; पण नोकरशहाच्या शहाजोगपणाने मांडला आहे. ते म्हणाले, "मागणी आणि पुरवठा यांच्यातील दरी भरून काढण्याकरिता आयात करणे अपरिहार्य होते." तजेन्द्र खन्ना खरे बोलत असतील तर मग आयातीचा निर्णय जाहीर करताना पंतप्रधानांनी देशात अन्नधान्याचा तुटवडा आहे स्पष्ट का म्हटले नाही? सरकारी खरेदीत पाहिजे तितका गहू मिळाला नाही असे पंतप्रधान म्हणाले. शेतकऱ्यांनी २८ लाख टन गहू कमी विकला म्हणून ३० लाख टनाची आयात करावी लागत आहे असे पंतप्रधान म्हणाले. याचा अर्थ असा की मागणी पुरवठ्यातील तफावत देशात नाही, सरकारी वितरण व्यवस्थेत आहे. वितरण व्यवस्थेकरिता आवश्यक तो गहू शेतकऱ्यांनी दिला नाही कारण बाजारात साडेतीनशे रुपयांचा भाव चालू असताना शासनाने बळेच दोनशे ऐंशी रुपयांचा आपला सरकारी भाव टिकविण्याचा हेका धरला. बाजारात व्यापारी, अडते यांना उतरण्याचा मज्जाव केला. पंजाबातील भारतीय किसान युनियनच्या दोन्ही संघटनांनी या प्रकाराचा विरोध केला होता.
 याखेरीज शेतकऱ्यांनी गहू बाजारात न आणण्याचे आणखी एक कारण होते. एरवी गव्हाचा हंगाम चालू झाल्यानंतर दोनच महिन्यांत सगळ्या पंजबातील गहू बाजारात उतरतो. शेतकऱ्यांनी जाणीवपूर्वक थोडे थांबून बाजारात जाण्याचे ठरविले. त्यामुळे सरकारची मोठी घबराट उडाली. साडेतीनशे रुपये भावाने देशात गहू खरीदण्याऐवजी परकीय चलनात साडेपाचशे रुपये खर्चुन गहू आयात करण्याचे सरकारने ठरविले हे योग्य झाले किंवा नाही?

 दोनशे ऐंशी रुपयांमध्ये पुरेसा गहू मिळाला असला तर सरकारने आयातीचा विचार केला नसता, हे नक्की. याचाच अर्थ कमी पडणाऱ्या गव्हाची भरती दोनशेऐंशी पेक्षा अधिक भावाने सरकारने केली असती तरी आयात करण्याची पाळी आली नसती. सरकारने असे का नाही केले ? आयातीचा महागडा 'अव्यापारेषु व्यापार' व्यापार का पत्करला?

बळिचे राज्य येणार आहे / ५९