पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/404

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

राब राब राबून आणि घाम गाळूनही आयुष्यात सुखाचा एक दिवस नाही अशी त्यांची स्थिती नाही काय ? चांगली पिके घेऊन धनधान्यांची मुबलकता झाली तर हेच सरकार शेतकऱ्यांना त्यांची पर्वा न करता त्यांना वाऱ्यावर सोडून देत नाही काय?
 हंगामी पाऊस आणि त्याची अनिश्चितता हा काही शेतकऱ्यांचा दोष नाही. त्याची किंमत राष्ट्रातल्या सर्वजणांनी सोसावयास नको काय ? अशा सर्व बाजूंनी घेरलेल्या, पिडलेल्या शेतकऱ्यांना एकजूट करून संघटित होण्याखेरीज काही मार्ग नाही काय? तर मग ही सत्य परिस्थिती शहरी स्वार्थसाधूंनी चालवलेल्या प्रचाराचा भेद करून एक दिवस ५० कोटी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्याखेरीज राहणार नाही.
 आज मावळा पेटला, उद्या घाटावरचा शेतकरी उठेल, परवा कोकणी, विदर्भी, मराठवाड्यातील किसान उठेल. लवकरच शेतकऱ्यांची पहाट येत आहे. शेतकरी जागा होणार आहे. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या कष्टामुळे प्रचारामुळे शेतकरी जागा होणार नाही. त्याची जागा होण्याची वेळ आली आहे म्हणून तो उठणार आहे. आम्ही कोंबड्याप्रमाणे आरवून नव्या पहाटेची ललकारी देत आहोत.
 वसंत ऋतू आला की कोकीळ येतोच तो काही वसंत ऋतू आणत नाही, का तयार करत नाही. वसंत ऋतू येण्याची वेळ झाली की, निसर्गात जे काही बदल घडू लागतात त्यातला एक कोकीळ पक्षाचे आगमन आहे.
 देशभर स्वयंस्फूर्तपणे लहान मोठ्या प्रमाणात चुकत माकत का होईना शेतकरी संघटना स्थापन होत आहेत. यामागे काहीही मध्यवर्ती योजना नाही. ही एक ऐतिहासिक गरज आहे. शेतकऱ्यांची पहाट ही अटळ गोष्ट आहे.
 तर नवीन जाणिवेने भारलेल्या ५० कोटी शेतकऱ्यांची ताकद ही आपली साधन संपत्ती आहे. हे कुबेर भांडार आपल्यासमोर उघडले पडले आहे. हात घालून वाटेल तितके न्यावे, उचलावे. साधनांची काहीच कमतरता नाही.
 संघटनेची ठिणगी पाडण्यासाठी काही किरकोळ आर्थिक गरज पडते तेवढी कशीही निभावून नेता येते. प्रत्येक शेतकऱ्याने संघटनेचा सभासद म्हणून एक दोन रुपये दिले तरी तेवढी गरज भागून जाते.

 प्रचाराची साधनेसुद्धा अगदी थोड्या खर्चात उभी करता येतात. बातमी येण्यासारखे काहीतरी घडवून आणा की, वर्तमानपत्रवाले धावत येतील तुमच्या बातम्या घ्यायला. भामनहरच्या शेतकऱ्यांनी चालू केलेल्या मोर्चाला व

बळिचे राज्य येणार आहे / ४०६