पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/403

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 जोपर्यंत आपण सर्व शेतकरी संघटनेसाठी कष्ट करतो, प्रसंगी खिशाला झीज सोसूनही धडपड करतो तोपर्यंत आपल्या संघटनेला ही स्वार्थी पुढाऱ्यांची कीड लागणार नाही.
 शेतकरी संघटनेने निधी जमवले की ही कीड संघटनेलाही लागल्याखेरीज राहणार नाही.
 शेतकरी संघटनेकडे पैसे नसले तरीही अफाट साधन संपत्ती आहे. ही साधन संपत्ती इतकी प्रचंड आहे की तिच्याशी तुलना करणे कुणालाच शक्य होणार नाही.
 ही साधन संपत्ती म्हणजे जवळ जवळ ५० कोटी कोरडवाहू शेतकरी समाज. ५० कोटी माणसांनी एकत्र येऊन काम करावयाचे ठरले तर त्यांना अशक्य काय आहे?
 प्रभू रामचंद्रांनी लंकेवर चालून जाण्यासाठी सेतू बांधायला काढला. त्या बांधकामासाठी त्यांच्याकडे वनवासात कुठला आला पैसा? त्यांनी नकाशे केले नाहीत. अंदाजपत्रके केली नाहीत. मंजुऱ्या घेतल्या नाहीत. त्यांच्या प्रचंड वानरसेनेतील प्रत्येकाने भराभर डोक्यावर दगड उचलून समुद्रात टाकावयास सुरुवात केली आणि हां हां म्हणता समुद्रावरचा पूल तयार झाला. लंका सर झाली.
 शेतकरी संघटनेचा जो विचार आहे जे तत्त्वज्ञान आहे ते जर खरोखर शेतकऱ्यांच्या हिताचे असेल, भारतातील कोरडवाहू शेतकऱ्यांची परिस्थिती जर खरोखर हलाखीची असेल, संघटना हा त्यावरचा जर रामबाण उपाय असेल तर आज ना उद्या सर्व कोरडवाहू शेतकरी समाज शेतकरी संघटनेच्या झेंड्याखाली संघटित होऊन लढा करण्यास उभा राहील.
 लक्षावधी शेतकरी उपासमारीमुळे निर्वासित होऊन शहरातील झोपडपट्ट्यांत जगत आहेत हे खरे नाही काय?
 शहरातील झोपडपट्ट्यातील गलिच्छपणा, घाण, दुर्गंधी, बकालपणा, अठरापगड जाती-धर्माचा बुजबुजाट आणि दारुच्या गुत्त्यांचा गोंगाट हे सर्व परवडले; पण शेतावरील उपासमार नको याच कल्पनेने ते तेथे आयुष्य काढीत नाहीत काय?

 शेतीचा धंदा कसाबसा चालवून खेड्यातील असंख्य शेतकऱ्यांना झाडपाला खाऊन राहावे लागते, मुला-माणसांना अंगभर कपडा देता येत नाही आणि पडक्या गळक्या घरातील आयुष्य कंठावे लागते हे खरे नाही काय? दिवसभर

बळिचे राज्य येणार आहे / ४०५