पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/401

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 कोणत्याही पक्षाचा आसरा न घेता संघटना उभी करण्यात एक फार मोठी अडचण येते. आजच्या राजकारणाचे स्वरूप नीट न समजल्यामुळे गावोगावची अनेक चांगली शेतकरी मंडळी भ्रमाने या ना त्या पक्षाच्या मागे गेली आहेत. काही निष्ठावंत मंडळींनी वर्षानुवर्षे पक्षाची कामे केली आहेत. या सर्व मंडळींना शेतकरी संघटनेच्या बाहेर ठेवायचे म्हटले तर संघटना दुबळी राहील. जोर धरणार नाही. संघटना मजबूत बनविण्यासाठी या वाट चुकलेल्या कार्यकर्त्यांना शेतकरी संघटनेकडे ओढून आणले पाहिजे.
 श्री शिवछत्रपतींच्या स्वराज्य संस्थापनेच्या काळात याच प्रकारचा प्रश्न होता. अनेक शूर वीर मराठे आदिलशाहीच्या सेवेत मान मरातब मिळवून होते. चुकीच्या स्वामीनिष्ठेच्या कल्पनांनी स्वराज्यांच्या प्रयत्नांचाच विरोध करत होते. यातील एकेका किल्लेदारास सभासदास भेटून त्यांना त्यांच्या खऱ्या कर्तव्याची जाणीव करून दिली. तेव्हाच स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. ज्यांनी नाठाळपणे आदिलशाहीची सेवा चालवून स्वराज्याशी द्रोह केला त्यांचे कठोरपणे पारिपत्यही करावे लागले.
 शेतकऱ्यांच्या खऱ्या कळकळीपोटी जे कार्यकर्ते गावोगावी पक्षांची भांडणं झुजवीत बसले आहेत. त्यांना ते शत्रूचीच कामगिरी कशी बजावीत आहेत याची जाणीव करून द्यायला पाहिजे. केवळ सरपंचपदासाठी किंवा दुसऱ्या एखाद्या मानासाठी शेतकऱ्यांशी द्रोह करणाऱ्या स्वार्थांध पुढाऱ्यांना शेतकरी संघटनेच्या कामात समरस होणे शक्य होणार नाही. या पुढील काळातही मंडळी आपोआपच बाजूला पडत जातील. आज पक्षीय काम करणाऱ्यांमध्ये ज्यांना शेतकऱ्यांच्या परिस्थितीबद्दल खरीखुरी कळकळ असेल ते आपोआपच संघटनेच्या कामात सामील होऊन जातील.
 संघटनेच्या साधनाच्या विचारात, पहिली स्पष्ट गोष्ट म्हणजे खरीखुरी शेतकरी संघटना ही आजच्या राजकीय पक्षांपासून संपूर्णपणे अलिप्त असणे आवश्यक आहे.


 नऊ
 पक्षांपासून दूर राहिल्यामुळे शेतकऱ्यांचे अंतिम ध्येय साध्य होईल हे खरे; परंतु त्यामुळे संघटकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागेल हेही तितकेच खरे.

 सर्व राजकीय पक्षांजवळ अफाट साधन संपत्ती असते. निवडणुकांच्या वेळी सर्व पक्ष कोट्यवधी रुपये जमा करतात. यातील बहुतेक पैसा हा देशांतील

बळिचे राज्य येणार आहे / ४०३