पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/398

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अशी आघाडी तयार झाल्याखेरीज भारतातील शेतकऱ्यांचे वसाहतवादी शोषण थांबणार नाही आणि शेती व्यवसाय किफायतशीर होऊ शकणार नाही. शेतकऱ्यांची वाढती हलाखीची स्थिती सुधारायची असेल तर त्यासाठी संघटनेचा उपयोग शहरी व ग्रामीण विभागांतील व्यापारी देवघेवीच्या अटी शेतकऱ्यांच्या दृष्टीने फायद्याच्या झाल्या पाहिजेत. यासाठी उभारायच्या लढ्यात औद्योगिक कामगार व सैनिक हे शेतकऱ्यांचे निसर्गसिद्ध साथी आहेत तर कारखानदार, व्यापारी व बागायतदार हे विरोधी शत्रू आहेत. आपल्या ताकदीच्या साहाय्याने हा लढा शेतकऱ्यांना प्रभावी रीतीने लढता येईल. आता प्रश्न राहिला अशी शेतकरी संघटना बांधायची कशी?
 विस्कळीत व फुटीर शेतकरी समाजाला एकत्र आणता येईल का? काय मार्गानी व कशा पद्धतीने शेतकरी संघटना बांधता येईल. गरीब शेतकऱ्यांच्या हाती साधने फार तुटपुंजी. एवढ्या थोड्या साधनांत प्रचंड देशव्यापी संघटना कशी काय उभारावयाची?
 हे सर्व प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचे व बिकट आहेत. त्या सर्वांची समग्र व समाधानकारक उत्तरे देणे या घटकेस कोणासही शक्य होणार नाही. संघटना तयार करताना अनेक आडाखे चुकतील. त्या अनुभवापासून धडा घेऊन चुका सुधारून घ्याव्या लागतील. संघटना बांधत असताना आज ध्यानीमनी नाहीत अशी नवीन संकटे व अडचणी उभ्या राहतील त्यांचाही सामना करावा लागेल.
 आजपर्यंतच्या अनुभवावरून काही विचार व कल्पना स्पष्ट होतात. तेवढ्यांचाच परामर्श येथे घ्यावयाचा आहे.

 अगदी पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्या देशात जे मोठे राजकीय पक्ष आहेत त्यापैकी एकाही पक्षाच्या झेंड्याखाली शेतकऱ्यांची प्रभावी संघटना उभी राहणार नाही. या सर्व पक्षांच्या शेतकरी आघाड्या व संघटना आहेत. पक्षांच्या प्रचंड यंत्रणेत शेतकरी विभाग हा एक छोटासा अंश असतो. पक्षाच्या कार्यक्रमांत या शेतकरी विभागाला फारच थोडे महत्त्व दिले जाते. देशांत शेतकऱ्यांची लोकसंख्या फार मोठी आहे. दारिद्र्याचा प्रश्न हा बहुतांशी कोरडवाहू शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. अशा परिस्थितीत ज्या पक्षाची गरिबीचा प्रश्न सोडवण्याची खरीखुरी इच्छा असेल त्या पक्षाचा मध्यवर्ती व सर्वात महत्त्वाचा विभाग शेतकरी विभाग हाच असला पाहिजे. व्यापारी, कारखानदार, कामगार, युवा, विद्यार्थी स्त्रिया इत्यादी घटकांच्या संघटनांना दुय्यम महत्त्व दिले गेले पाहिजे.

बळिचे राज्य येणार आहे / ४००