पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/397

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

घरच्या खाण्यासाठी धान्य विकत घ्यावे लागते त्यांचे यामुळे मोठे नुकसान होईल. हा युक्तिवाद अत्यंत फसवा आहे. धान्य विकत घ्यावे लागणारे शेतकरी वेगवेगळ्या कारणांनी धान्य विकत घेतात.
 प्रथमतः घरी मुबलक पीक येणारे शेतकरी त्यांच्या शेतात न होणारा माल विकत घेतात. उदा. भात, डाळी, गहू वगैरे. शेतीमालाचा भाव वाढल्याने याच्यावर कोणताही परिणाम होणार नाही.
 त्यानंतर घरी अपुरे पीक येत असल्याने त्याच्या बदल्यात कमी दर्जाचे पीक विकत घेणारे शेतकरी उदा. मावळात भात पिकवणारे शेतकरी भात खाऊन वर्ष भागणार नाही म्हणून भात विकतात व बाजरी घेऊन वर्ष काढतात. शेतीमालास योग्य भाव दिल्यास या प्रकारच्या शेतकऱ्यावर विशेष अनिष्ट परिणाम होण्याची शक्यता नाही.
 तिसरा धान्य विकत घेणारा शेतकऱ्यांचा वर्ग म्हणजे उत्पादन अपुरे असल्यामुळे शेतमजुरी करून धान्य विकत घेणारा. या वर्गावरही अनिष्ट परिणाम होण्याची शक्यता नाही. शेतीमालाचे भाव पडत असतानासद्धा गेल्या दोन-तीन वर्षांत मजुरीचे दर वाढत राहिले आहेत. ते भाव वाढल्यास त्याचा परिणाम शेतमजुरीचे दर वाढण्यात निश्चित होईल.
 या अती गरीब वर्गाचा प्रमुख प्रश्न आहे तो शेती हे जगण्याचे साधन अपुरे पडते आहे हा आहे. ग्रामीण भागात प्रक्रियेचे कारखाने आणि इतर उद्योगधंदे निघावयास हवेत ते या दरिद्रीनारायणासाठी. शेतमालाचे भाव चढोत वा पडोत त्यांची हलाखी कायमच राहते. त्याला उत्तर शेतीच्या बाहेर शोधावयास पाहिजे. त्यासाठी शेतीमालाच्या अपुऱ्या भावाचे समर्थन करणे तर्कदुष्ट आहे.
 या विद्वानांचे मत जर ग्राह्य धरले तर शेतमालाचे भाव जितके कमी तितका शेतकऱ्यास जास्त फायदा असे विक्षिप्त तात्पर्य निघेल. असल्या शहरी तर्कशास्त्राकडे दुर्लक्ष करून देशभरच्या शेतकऱ्यांनी आपले सर्व लक्ष एका ध्येयावर केंद्रित केले. आपल्या कष्टाचा योग्य मोबदला म्हणजेच शेतीमालास योग्य भाव या एका ध्येयासाठी शेतकऱ्यांचा फुटीर व विस्कळीत वर्ग संघटित करता येईल.


 आठ

 आपल्या खंडप्राय देशात लक्षावधी खेड्यापाड्यांतून विखुरलेल्या विस्कळीत आणि फुटीर शेतकरीवर्गाची एकसंध आघाडी तयार करणे हे प्रथम उद्दिष्ट.

बळिचे राज्य येणार आहे / ३९९