पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/394

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अपुरा मोबदला हेच आहे. शेतीमाल काढण्यासाठी जो काही खर्च येतो तो कधीही भरून येत नसल्यामुळे कोरडवाहू शेती हा बुडीत धंदा झाला आहे. पावसाच्या अनिश्चितपणामुळे पिकाची जी बूड किंवा नुकसानी होते ती सर्वस्वी शेतकऱ्याच्या डोक्यावर पडते. जर महाभाग्याने एखादे वर्षी बरे पीक आले तर बाजारांत मुबलक पीक आल्यामुळे भाव कमी होतात. याखेरीज दरवर्षी हंगामात सर्व पिके बाजारात एकदम आल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या खर्चाइतकाही मोबदला मिळू शकत नाही. शेतीतल्या खोटीचा परिणाम साहजिकच शेतमजुरीच्या दरावर होतो. शेतकरी कुटुंबाच्या राहणीमानावर होतो. दिवसेंदिवस शेतकऱ्यांची स्थिती खचतच जाते.
 सद्य:स्थितीत कोरडवाहू शेतकरी बुडत चालला आहे. पाणी पार त्याच्या नाका तोंडात जाऊ लागले आहे. अशा वेळी त्याला पोहण्याची ताकद यावी म्हणून शक्तिवर्धक औषधे फेकण्यात काही अर्थ नाही. त्या औषधाचा कांही परिणाम होणार नाही आणि होणार असला तरी त्याच्या आधीच शेतकरी बुडून जाईल. त्याच्याकडे आज लगेच भोपळा फेकण्याची गरज आहे. हा भोपळा म्हणजे सर्व शेतीमालास उत्पादन खर्चाच्या थोडाफार तरी वर मोबदला. असा मोबदला मिळाला तरच शेतकरी आपली परिस्थिती सुधारू शकेल.
 ही उपाययोजना परिणामकारक आहेच; पण त्याबरोबर सर्व शेतकऱ्यास उपयोगी आहे. म्हणूनच शेतीमालाला योग्य भाव मिळवणे हा शेतकरी संघटनेचा मध्यवर्ती कार्यक्रम असला पाहिजे. या समान ध्येयासाठी सर्व शेतकऱ्यांना एकत्र करता येईल. त्यांच्यामध्ये वादविवाद निर्माण न होता सर्वांचे एकमत होऊन मजबूत आघाडी उभारण्यासाठी ते तयार होतील.
 याचा अर्थ असा नाही की शेतकरी संघटना स्थानिक अडचणीकडे लक्ष देणार नाही. गावोगावच्या शेतकरी संघटनांची जितकी ताकद असेल त्या प्रमाणात रस्ता, पाणी, वीज या संबंधीच्या अडचणी दूर करण्यासाठी संघटनेने अवश्य प्रयत्न करावयास पाहिजेत. अशा लढ्यामुळे संघटना मजबूत होण्यास मदत होईल. पण अशा लहान चळवळींनी व लढ्यांनी बांधलेल्या संघटनेचा मुख्य उपयोग हा शेतीमालास रास्त भाव मिळवण्याच्या मुख्य ध्येयासाठी करावयाचा आहे. याचा विसर पडता कामा नये.


 सात

 शेतमालास योग्य भाव मिळवणे हे मध्यवर्ती ध्येय. हे साध्य झाल्यास

बळिचे राज्य येणार आहे / ३९६