पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/391

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

उद्योगधंद्यात काम करण्यास तयार असलेले असंख्य बेकार आणि युद्धभूमीवर जीव ठेवण्यास तयार असलेले लक्षावधी जवानही मिळतात.
 कामगार ज्याप्रमाणे शेतकऱ्याचे दोस्त आहेत. त्याचप्रमाणे जवान हेही शेतकऱ्याचे साथी आहेत. या अर्थाने शेतकरी संघटनेने 'जय किसान ! जय जवान!!' ही घोषणा स्वीकारली आहे.
 देशी किंवा विदेशी वसाहतवादाचा सामना करतांना किसानांइतकीच महत्त्वाची कामगिरी जवानांनी बजावलेली आहे. आपल्या देशातून इंग्रजांना जाणेही भाग पाडले ते आझाद हिंद फौजेत सामील झालेल्या जवानांनी आणि बंडखोर नाविकांनी जवानांच्या या उठावानंतर लॉर्ड माऊंटबॅटन यांनी पंतप्रधान यांना लिहिले होते, 'भारतावर आता बाहेरून राज्य करणे शक्य नाही; पण आतून करता येईल.' पण आतून करता येईल. वसाहतवाद्यांच्या कारवायांना यश आले. भारतावर इंडियाचे राज्य चालू झाले. हजारो जवानांचे आणि हुतात्म्याचे बलिदान व्यर्थ झाले. वसाहतवादाचे बाहेरील रुपडे फक्त बदलले. सामान्य रयत हलाखीतच भरडत राहिली.
 भारताच्या या नव्या वसाहतवादाविरुद्धच्या लढ्यात आणि त्यानंतर उभारावयाच्या शेतकरीप्रणीत समाजात भारतीय जवानांचा काय भाग असावा किंवा असेल याची चर्चा निरर्थक आहे. इतिहासाचा पुनःप्रत्यय आल्याखेरीज राहणार नाही. देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व पणाला लावावयाला शेतकरी चुकणार नाही, कामगार कचरणार नाही आणि जवान विसरणार नाही.


 सहा
 शेतकरी समाज हा देशभर विखुरलेला आहे. हा समाज फुटीर आहे. अशा विखुरलेल्या व फुटीर वर्गाची संघटना यशस्वीरीत्या बांधण्यासाठी काय मार्ग योजावेत याचा आता विचार करावयाचा आहे.
 संघटना बांधण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व शेतकऱ्यांना मान्य असे समान ध्येय निश्चित करणे. जर असे समान ध्येय ठरवता आले नाही तर मजबूत संघटना उभी राहणार नाही.
 प्रत्येक गावच्या काही विशेष अडचणी असतात. कुठे प्यायला पाणी नाही, कुठे वाहतुकीची सोय नाही, कुठे वीज नाही, कुठे शाळा नाही, कुठे औषधपाण्याची सोय नाही.

 काही ठिकाणी सरकारी अधिकारी जाच करतात तर कुठे गावांतल्या

बळिचे राज्य येणार आहे / ३९३