पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/390

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

असो, शक्यतो हे काम दुसऱ्याने केलेले बरे ही साहजिकच सर्वांची भावना आपण होऊन स्वखुशीने असे सतीचे व्रत स्वीकारणारे कसे काय मिळवावेत ? ही अडचण सोडवण्यासाठी बहुतेक सर्व विकसित देशांत लष्करी शिक्षण हे सर्व नागरिकांस सक्तीचे असते व युद्धासारखा प्रसंग आल्यास सर्व नागरिकांस लष्करी कारवाईत सामील व्हावे लागते. राष्ट्ररक्षणासाठी जीवावर घ्यायचा धोका व त्याचे गंभीर परिणाम हे राष्ट्रातील सर्व नागरिक उच्चनीचतेचा विचार न करता विभागून घेतात.
 आपल्या देशात अर्थातच अशी स्थिती नाही. आयुष्यभर दुसऱ्याच्या कष्टांवर मौजमजा करणारे शहरी लोक आपले सुखाचे आयुष्य धोक्यात घालायला थोडेच तयार होणार ? युद्धाचे भीषण रणकंदन चालू असताना क्रिकेटची टेस्ट मॅच चालू असताना कोणत्या बाजूच्या किती धावा झाल्या ते पाहावे त्याप्रमाणे सैन्य लाहोरला पोंचले किंवा नाही, ढाक्का किती मैल राहिले असे प्रश्न विचारत रेडिओला कान लावून बसायचे हे त्याचे काम. कुणा आसपासच्या कुटुंबातील एखादा लेफ्टनंट किंवा पायलट जखमी झाल्याची किंवा कामी आल्याची बातमी आली म्हणजे तर जणू आपण प्रत्यक्ष लढाईतच भाग घेतला असल्याची भावना होते. अशा करमणुकीसाठी जवानांकरता मदत म्हणून काही रुपये कपडे द्यावे लागले तर ते काही महाग नाही. युद्ध परिस्थितीचा फायदा घेऊन मालाचा साठा करून किमती वाढवून काळाबाजार करून उपटता आला तर फारच उत्तम. या वृत्तीचे शहरी थोडेच लष्करात भरती होऊन हातात बंदूक घेऊन लढावयास जाणार आहेत ?
 मग जवान येतात कोठून ? कोणत्या भागातून ? कोणत्या वर्गातून ? लष्करातील जवान हा जवळजवळ सगळा ग्रामीण भागातून म्हणजे भारताचा रहिवासी आहे, त्याचा घरचा मूळचा व्यवसाय शेती, कोरडवाहू शेती किंवा केवळ शेतमजुरी, शहरी अर्थव्यवस्थेच्या कारवायांमुळे शेतीत काहीच सुटत नाही. मुलाबाळांना एकवेळ पोटभर मिळणे कठीण. शिक्षणाची काही शक्यता नाही. भविष्यात सुखाची काही आशा नाही आणि जवळजवळ नेमाने दुष्काळ आला की, सर्व दाही दिशांवर उधळून जायचे. या अशा आयुष्यातून सुटण्याचा मार्ग म्हणून शेतकरी तरुण लष्करात जवान म्हणून भरती होतो, अशा भरती होऊ इच्छिणाऱ्या तरुणांचीही इतकी गर्दी होते की, अधिकाऱ्यांचे हात दाबून भरती करून घ्यावी लागते.

 शेतकऱ्याच्या शोषणातून मिळणाऱ्या प्रत्यक्ष फायद्याबरोबर शहरी व्यवस्थेत

बळिचे राज्य येणार आहे / ३९२