पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/389

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

लुंगवतो तर मजुरीचा खर्च कमी करण्यासाठी तो कामगारांना लुबाडतो. शेतीमालाचे भाव कमीत कमी ठेवून तो या दोन्ही गोष्टी एकाच वेळी साधतो. शेतीमालाच्या किमती सुधारल्या तर शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारेल. झोपडपट्टीतील बेकारांची संख्या घटेल व त्यामुळे मजुरीचे दरही वाढतील.
 केवळ हातावर पोट भरणाऱ्या कामगाराच्या नैसर्गिक लढाऊ प्रवृत्तीने शहरी राज्यांच्या विरुद्धच्या लढ्याचे नेतृत्व साहजिकच त्यांच्याकडे जाईल. शेतकऱ्यांना शोषणावर आधारलेली चालू व्यवस्था त्या शोषणातून निर्माण झालेला कामगार वर्गच मोडून टाकेल. शेतकरीवर्गाने कामगारांच्या लढ्याना सतत सहानुभूती दाखवली पाहिजे व सक्रिय पाठिंबा दिला पाहिजे.


 पाच
 शेतकरी त्यांची संघटना, त्यांचा लढा या सर्वांचा आणखी एका वर्गाशी संबंध येतो. या संबंधाचा निदान धावता उल्लेख तरी करणे आवश्यक आहे.
 भारताचे लष्कर अफाट मोठे आहे. त्यात लक्षावधी शिपाई आहेत. शांततेच्या काळात पुढील लढ्याची तयारी करणे तसेच महापूर, दूष्काळ अशा आपत्तीच्या वेळी नागरिकांना साहाय्य करणे ही कामे शिपाई पार पाडतात. युद्धकाळात प्राणांची पर्वा न करता शत्रूचा प्रतिकार करून देशांचे रक्षण करणे हे त्यांचे कर्तव्य. ही कामगिरी बजावताना हजारोंनी आपल्या प्राणांची आहुती दिलेली आहे. देशात अनेक प्रकारच्या नोकऱ्या आहेत; पण पगारावर प्राण द्यावे लागणारी शिपाईगिरी ही एकच नोकरी आहे. युद्ध सुरू असले की जवानांच्या बहादुरीच सगळीकडे वाहवा होते. पुढारी त्यांची प्रशंसा करतात. गांवोगांवचे कवी त्यांच्यावर कवने रचतात. शहरांतील सुखवस्तू बायका आणि त्यांनी महिलामंडळे जवानांना खाण्याच्या वस्तू पाठवू लागतात. त्यांच्यासाठी गरम बंड्या विणू लागतात. काही दिवस सर्व वातावरण सैनिकमय होऊ लागते.
 लढाई संपली की जवानांचा सर्वांना सहजच विसर पडतो. लढाईत कामी आलेल्या जवानांच्या बायकामुलांवर तुटपुंज्या पेन्शनवर दिवस कंठण्याची वेळ येते. जखमी झालेल्या, हात पाय गमावलेल्या सैनिकांना बहुतांशी धर्मादाय किंवा सामाजिक सेवांवर अवलंबून राहावे लागते. सेवानिवृत्त झालेल्या सैनिकांची स्थितीही फारशी स्पृहणीय नाही. काही स्वयंसेवी संघटना त्यांना साहाय्य करण्याचा प्रयत्न करतात तेवढाच त्यांना आधार.

 देशासाठी मरण स्वीकारणाऱ्या हौतात्म्याचे काव्य कितीही स्फूर्तिदायक

बळिचे राज्य येणार आहे / ३९१