पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/388

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मोठ्या शहराकडे वाहत राहिला आहे. शहरातल्या झोपडपट्ट्या सतत वाढत आहेत याचा खरा अर्थ असा, की ग्रामीण भागातील कोरडवाहू शेतकऱ्यांना जमिनीवर जगणे अशक्य आहे.
 शेतकऱ्यांच्या मालाला कमीत कमी भाव देण्यामध्ये शहरी समाजाला दुहेरी फायदा होतो. कच्चा माल कमीत कमी भावात घेऊन कारखानदारी माल महागात महाग विकून होणारा नफा हा पहिला फायदा. अशा तऱ्हेने कंगाल झालेला शेतकरी शहरी झोपडवस्तीत जाऊन राहिला, की स्वस्त मजुरीत भरपूर पुरवठा होऊन कारखानदारी कामाचा खर्च कमी होतो हा दुसरा फायदा.
 शहरात कामाच्या शोधात आलेल्या शेतकऱ्यांचे हाल कांही संपत नाहीत. चांगल्या कारखान्यात नोकरी करणारे भाग्यवान फार थोडे. बहुतेकाना हमाली मजुरी करून कसेबसे पोट जाळावे लागते. तरीसुद्धा खेड्यावरील शेतात राहून संपूर्ण उपासमार होण्यापेक्षा शहरात अर्धपोटी तरी राहणे त्याला पत्करावे लागते.
 गावातल्या हजारो वर्षाच्या परंपरेने चालत आलेले आयुष्य सोडून सर्व राज्यांतून आलेल्या अनेक धर्मांच्या, अठरापगड जातींच्या झोपडवस्तीत राहणे त्याला भाग पडते. एकूण सर्वच जीवन उद्ध्वस्त झालेले, जुन्या परंपरा मोडकळीस आलेल्या. स्वत:चे म्हणायला मालमत्ता काही नाही. शरीरात ताकद आहे तोपर्यंत राबराब राबायचं आणि हातावर पोट भरायचे अशी त्याची अवस्था होते.
 पण निसर्गाचा काय चमत्कार आहे. जे मातीत संपूर्ण गाडावे त्याचेच बी अंकुरते आणि रोप फुटते. ज्यांना आयुष्यात कशाचाच आधार नाही त्यांना गमवायलाही काही नसते.
 गमावण्याचे काही नाही तर कुणाला कशासाठी भ्यायचे? मेलेल्याला मरणाचे काय भय ? अशा विचाराने कामगार लढ्याला तयार होतात व त्यासाठी एकजूट करतात. गेल्या चाळीस वर्षांच्या काळात संघटित लढा देऊन कामगारांनी जी प्रगती केली तिचा आदर्श शेतकऱ्यांनी डोळ्यासमोर ठेवला पाहिजे.
 शेतकरी आणि कामगार हे एकमेकांचे साथी आहेत. भाऊ भाऊ आहेत. शहरी समाजाविरुद्धचा लढा त्या दोघांनाही एकत्र लढावा लागणार आहे.

 दोघांचा शत्रू एकच आहे. शहरी समाज, जो दोघांचे शोषण करतो. दोघांनाही नागवतो. कच्च्या मालाचे भाव कमी करण्यासाठी तो शेतकऱ्याला

बळिचे राज्य येणार आहे / ३९०