पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/387

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गोष्ट स्पष्ट आहे की, या दोन गटांचे हितसंबंध अगदी वेगळे आहेत. दोघांनाही आपल्या विकासाची वाटचाल वेगळी वेगळीच करावी लागेल. शहरी इंडियांतील प्रतिनिधींशी हातमिळवणी करून बागायतदारांनी राज्यसत्ता हाती घेतली आणि इंडियाचे ध्येयधोरण पुढे चालवले. भारतावरील इंडियाच्या वसाहतवादी राज्यांत इंडियाच्या हस्तकांचे काम त्यांनी घेतले. यामुळेच कोरडवाहू शेतकऱ्यांच्या संघटनेत बागायतदारांच्या गटाला स्थान असूच शकत नाही. बागायतदारी राजकारणापासून शेतकऱ्यांनी सावध राहिले पाहिजे. शेतकऱ्यांच्या नावाने बोलून बागायतदार राजकारण्यांनी फार काळ फसगत केली आहे. ती यापुढे चालू देता कामा नये.


 चार
 ग्रामीण भागातच राहणाऱ्या जमिनीच्या पिकांवर जगणाऱ्या बागायतदारांशी शेतकऱ्यांच्या संघटनेची आघाडी होऊ शकत नाही. त्या उलट शेतीशी अजिबात संबंध नसलेल्या शहरांतील औद्योगिक कामगारांबरोबर शेतकरी संघटना एकजूट करू शकते.
 वरवर पाहणाऱ्यास असे वाटल्याशिवाय राहणार नाही यात काही तरी चूक आहे. आमच्या जवळपास राहणारे जमीन कसणारे बागायतदार आमच्यातील नव्हते आणि यंत्रावर काम करणारे झोपडपट्टीत राहणारे कामगार मात्र आमच्यातले हे कसे काय ? वरवर पाहणाऱ्याला जरी हे थोडे चमत्कारिक दिसले तरी जरा विचार करता या चमत्काराचे कारण सहज समजून येईल.
 आज शहरांतील झोपडपट्ट्यांतून आणि गलिच्छ वस्तीत राहणारे कामगार आले कोठून ? मुंबई-पुण्यासारख्या शहरांतील झोपडपट्ट्यांतील वस्ती सतत वाढत आहे. पुण्यामध्ये एकूण लोकवस्तीच्या ३८ % इतकी झोपडपट्टीत राहणाऱ्यांची संख्या आहे. १९४७ साली हे प्रमाण ६ % सुद्धा नव्हते. शहरात मोकळी जागा दिसेल तिथे पत्र्या खोक्याची घरे दाटीवाटीने उभारून, पावसापाण्यात, चिखलात, घाणीत राहून मिळेल ते काम करणारे कष्ट, मेहनत करणारे हे लोक येतात तरी कोठून ?

 झोपडपट्टीतील लोक हे मूळचे ग्रामीण भागांतील कोरडवाहू शेतकरी आहेत. शेतीचा धंदा दिवसेंदिवस बुडीत जाऊ लागला. शेतीवर जगणे अशक्य होऊ लागले. तसतसे पोटापाण्यासाठी कामाच्या शोधात हे शेतकरी शहरात येऊन राहू लागले आणि ग्रामीण भागांतील निर्वासितांचा हा ओघ सतत

बळिचे राज्य येणार आहे / ३८९