पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/380

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तालुक्यांतील शेतकरी ज्याबद्दल उदासीनच राहतील. महाराष्ट्र राज्यातील किंवा भारतातील सर्व शेतकऱ्यांना तर या मागण्या क्षुल्लकच वाटतील.
 शेतकरी संघटना बांधण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना ज्यात स्वारस्य वाटेल अशा सर्वमान्य मागण्या मांडण्यात आल्या पाहिजेत.
 यासाठी शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा सखोल विश्लेषणात्मक अभ्यास झाला पाहिजे, तरच त्यावरची अचूक उपाययोजना ठरवता येईल. चार आंधळ्यांची एक प्रसिद्ध गोष्ट आहे. ते चौघेही हत्ती पाहावयास निघाले. एकाच्या हाती सोंड लागली, तो म्हणाला, 'हत्ती मोठ्या नळीसारखा आहे.' ज्याचा हात हत्तीच्या पायाला लागला, तो म्हणाला, 'हत्ती तर खांबासारखा आहे.' तिसऱ्याने हात उंच केला तो हत्तीच्या कानाला लागला त्याला वाटले हत्ती सुपासारखा आहे. तर चौथा आंधळा शेपटीवरून हात फिरवीत म्हणाला, 'हत्ती अगदी सापासारखा आहे.'
 शेतकऱ्यांचे प्रश्न हे हत्तीसारखेच अवाढव्य आहेत. कोणी म्हणतो, शिक्षणाशिवाय शेतकऱ्याची उन्नती होणार नाही. दुसरा म्हणतो, आधुनिक शेतीची तंत्रे वापरल्याखेरीज शेतकऱ्यास तरणोपाय नाही. आणखी तिसरे म्हणतात, ग्रामीण भागात कर्ज वगैरे रूपाने अर्थसाहाय्य व पतपुरवठा करणे आवश्यक आहे, तर कोणी म्हणतात, कुटुंबनियोजनावर सर्वात जास्त भर द्यावसाय हवा, शेकडो आंधळ्यांची शेकडो मते. त्यामुळे शेतकऱ्यांचा बुद्धिभेद होतो. शेतकऱ्यांची प्रगती हे इतके अवघड आणि मोठे काम आहे की ते अगदी हळूहळू आणि संथपणेच होणार अशी त्याची कल्पना होते.
 आपल्या स्वत:च्या विकासासाठी किंवा उद्धारासाठी आपण स्वत: तातडीने उभारीने काही करू शकत नाही अशी एकदा धारणा झाली की, संघटनेसाठी लागणारी स्फूर्ती, उत्साह निर्माण होऊ शकत नाही आणि तेजोभंग झालेला तळमळीचा शेतकरी कार्यकर्तासुद्धा गावोगावचे उत्सव, भजनीमंडळी, काकड आरत्या, पंचायतीचे राजकारण आणि निवडणुका अशा कामात मन रमवू लागतो.

 आतापर्यंत शेतकऱ्यांना संघटित करण्याचे जे प्रयत्न झाले त्यात आणि आपल्या शेतकरी संघटनेत फार मोठा फरक आहे. आपली संघटना ही एका निश्चित तत्त्वज्ञानावर आणि विचारप्रणालीवर आधारलेली आहे. संपूर्ण परिस्थितीचा आणि प्रश्नांचा समग्र अभ्यास करून शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर निश्चित तोडगे तिने शोधले आहेत. काही शहरी विद्वानांप्रमाणे पुस्तकी अभ्या

बळिचे राज्य येणार आहे / ३८२