पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/378

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

शेजारची गावे अशी आहेत, की त्यांच्यात वर्षा दोन वर्षात दगडकाठ्यांची देवघेव होतेच.
 'ज्या समाजाची प्रगती खुंटली आहे, त्याची स्थिती साचलेल्या डबक्याप्रमाणे होते आणि त्यात क्षुद्र कीडे वळवळू लागतात. ही दलदल साफ करण्याचा उपाय म्हणजे पाण्याला वाहण्याची वाट करून देणे.
 साडेसहा लाख बेटे
 शेतकऱ्यांची वस्ती साडेसहा लाख खेड्यांतून विखुरलेली. मोठमोठ्या शहरांच्या प्रदेशातील किंवा राजरस्त्यांच्या आसपासची थोडी भाग्यवान खेडी सोडली तर बाकीची कच्च्या रस्त्यांनी किंवा गाडीवाटेने जोडलेली. क्वचित पायवाटेनेही, यातील बहुतेक रस्ते पावसाळ्यात बंद. तार खाते आणि टेलिफोन खाते जवळजवळ संपूर्णपणे 'इंडियन' म्हणजे शहरांच्या सेवेस वाहिलेली, टपालखात्याने दररोजची डाकसेवा चालू करून काही वर्षे झाली म्हणतात. मुंबईत आणि दिल्लीत बसून टपाल अधिकारी अशा घोषणा अधूनमधून करत असतात. प्रत्यक्षात ग्रामीण भागातील बटवडा हा प्रमुखत: बाजाराच्या दिवशी बाजाराच्या जागीच होतो. टपालवाला फारच जिगरी असेल तर आठदहा दिवसांनी एकेका खेड्याला जाऊन येतो. परिणाम असा की, पंचक्रोशीतल्या शेतकऱ्यांच्या गाठीभेटीसुद्धा बाजारच्या दिवशीच झाल्या तर व्हायच्या एरवी महत्त्वाच्या कामासंबंधाने निरोप पाठवायचा म्हटले तरी लांब तंगडेतोड करीत गेल्याखेरीज गत्यंतर नाही. प्रत्येक खेड्याचा बाहेरच्या जगाशी संबंध इतका थोडा आणि कठीण की जणू काही प्रत्येक खेडे हे अथांग पाण्याने चारी बाजूने वेढलेले बेट आहे. भारतातील आपली साडेसहा लाख खेडी म्हणजे साडेसहा लाख बेटे आहेत. त्यांचा एकमेकांत संपर्क जवळजवळ नाही.
 शेतकरी संघटना कार्यकर्त्यांना या लाखो बेटांतील शेतकऱ्यांशी संपर्क साधन त्यांची अशी एकजूट बनवायची आहे की कोट्यवधी निद्रिस्त शेतकरी सिंह खडबडून जागे होतील आणि अशी गर्जना करतील की, त्यांच्या निद्रावस्थेचा फायदा घेणारे कोल्हे, लांडगे आणि खोकड यांची प्रभावळ गर्भगळीत होऊन जाईल.

 त्यामानाने शहरी इंडियातील संघटनेचे काम किती सुलभ आहे पाहा. तारा, टेलिफोन, टपाल व्यवस्था, वर्तमानपत्रे वगैरे साधने वापरून कार्यकर्त्यांना एकमेकांशी संपर्क साधणे सहज शक्य होते. डोंबाऱ्याने ढोलके बडवले तरी पाचशे माणसे जमतात. अशा ठिकाणी सभांतून प्रचार करणे सोपे होते.

बळिचे राज्य येणार आहे / ३८०