पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/377

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्रेमापायी किती भांडणे, डोकेफोडी, कब्जेदलाली झाल्या असतील आणि किती कुटुंबे धुळीला मिळाली असतील आणि देशोधडीला लागली असतील याची गणती नाही.
 शेताच्या वादावादीपलीकडे गावातली भांडणे, मानापमानाच्या कल्पना, घराघरातले हेवेदावे आणि इतर शेकडो लहान मोठ्या कारणांनी सुरू झालेली भांडणं पिढ्यान्पिढ्या चालल्याची उदाहरणे जवळ जवळ प्रत्येक गावी सापडतील.
 त्यातले त्यात आपला देश जातीव्यवस्थेने ग्रासलेला. ब्राह्मण शेतकऱ्यास इतर शेतकऱ्यांशी आपले काही आतड्याचे संबंध आहेत याची जाणीव नाही. मराठा शेतकरी हरिजन वस्तींतील शेतकऱ्याला आपल्यातला समजतच नाही. हरिजन शेतकऱ्याला इतर शेतकऱ्यांच्या सहकार्याने काही करण्याची भीतीच वाटते म्हणा किंवा इच्छा नाही असे म्हणा.
 निवडणुकांमुळे गावातली राहिली-सुहिली एकीसुद्धा तडकून जाते. वेगवेगळे पक्ष आणि उमेदवार आपले नगारे वाजवीत फिरू लागले की गावकऱ्यांची डोकी फिरू लागलीच. कित्येक निवडणुका आपल्या आणि गेल्या. काही उमेदवार हरले, थोडे जिंकले. निवडून आलेल्या उमेदवारांनी लगेच सफेद कपडे घालायला सुरुवात केली; पण शेतकऱ्यांच्या खऱ्याखुऱ्या प्रश्नांकडे कधी लक्षसुद्धा दिले नाही. निवडणुकांच्या राजकारणाचा आणि शेतकरी जीवनाचा अर्थाअर्थी काहीसुद्धा संबंध कधी दिसलेला नाही. तरीसुद्धा या निवडणुकांमुळे गावात कायमचे तट पडतात. गावातल्या एका फळीने एक बाजू घेती, की दुसऱ्या फळीने दुसरा पक्ष घेतलाच. यामध्ये पक्षाच्या जाहिरनाम्याचा कार्यक्रमाचा वा उमेदवाराच्या लायकीचा काहीही संबंध नाही. परंपरागत चालत असलेल्या गावातल्या वेगवेगळ्या गटाची ही फक्त विरोधभक्ती.
 मुळात देशभरात शेतीशेतीतच केवढा फरक. पंजाब हरयाणातील तीनचारशे एकरांची ट्रॅक्टर आणि इतर यंत्रसामग्री वापरून केलेली आधुनिक शेतीही यात मोडते. आणि कोकणात डोंगरावर कसेबसे बांध घालून त्यावर पालापाचोळा जाळून केलेली शेतीही यातच मोडते. व्यवस्थित फायदा काढणारे सधन, ऊस आणि द्राक्षे बागायतदारही त्यात जमा होतात. तर कसेबसे भात किंवा नागलीचे एक एक पीक काढणारे आणि जन्मभर लंगोटी लावून फिरणारे शेतकरी यात येतात. स्वत:च्या शेतावर क्वचितच जाणारे शेतकरी यात मोडतात आणि स्वत:च्या शेतांवर खपून जमेल तेव्हा दुसऱ्याच्या शेतावर मजुरी करणारेही.

 या खेरीज गावातले हेवेदावे आणि भांडणे वेगळीच. कित्येक शेजारची

बळिचे राज्य येणार आहे / ३७९