पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/376

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आहे. मधून मधून एखाद्या ठिकाणी एखादी ज्वाळा उफाळत आहे. ही धुमसती आग चेतवावी कशी याचा सर्व बाजूने विचार व्हावयास पाहिजे.
 या प्रयत्नांचे नैमित्तिक स्वरूप काढून टाकून कायम स्वरूपाची देशव्यापी शेतकरी संघटना कशी उभारता येईल? या मार्गात अडचणी काय आणि किती? या अडचणींवर मात कशी करता येईल ?
 संघटना कार्यातील अडचणी
 शेतकऱ्यांची संघटना बांधण्याच्या कामातील अडचणी व अडथळे खरोखर इतके मोठे व कठीण आहेत की, मी मी म्हणणाऱ्यांनीसुद्धा निराश व्हावे. संघटना बांधण्यासाठी तीन गोष्टीची मुख्यत: आवश्यकता असते. प्रथमत: ज्यांची संघटना बांधायची त्यांच्यात काहीतरी साम्य हवे. एकसूत्रता हवी. दगडांची आणि विटांची एक संघटना होऊ शकत नाही. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे या घटकांना एकमेकांशी संपर्क साधण्याची, विचारविनिमय करण्याची संधी आणि साधने असली पाहिजेत. एकमेकांच्या विचाराची देवघेव होऊ शकत नसेल तर संघटना कशी व्हावी? एकी बनविण्याच्या कामात तिसरी अत्यंत आवश्यक गोष्ट म्हणजे सर्वांचे एकतरी समान ध्येय असले पाहिजे, समान चेतना असली पाहिजे. निश्चित उद्दिष्टांखेरीज संघटना बांधता येत नाही आणि टिकवता तर अजिबात येत नाही.
 शेतकऱ्यांची संघटना आजपर्यंत यशस्वीरीत्या बांधता आली नाही याचे कारण या तीन आवश्यक गोष्टींपैकी एकीचीही पूर्तता होऊ शकलेली नाही. शेतकरीवर्गात एकजिनसीपणा जवळजवळ नाही. वस्ती देशभर विखुरलेली आणि दळणवळणाची साधने नाहीत. त्यामुळे परस्पर विचार विनिमय नाही. वेगवेगळ्या पंथांनी पक्षांनी आणि पुढाऱ्यांनी खोटी उद्दिष्टे घालून दिल्यामुळे शेतकऱ्याला खरे खोटे काय याचा भ्रम पडलेला. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या गोष्टीचा सर्वांगीण विचार केला पाहिजे तरच त्यांच्या प्रयत्नास यश येण्याची शक्यता निर्माण होईल.
 शेतकरी-फुटीर समाज

 केवळ आपल्या देशातच नव्हे तर जगातील सर्व देशांत, शेतकरी हा फटकळ व्यक्तिवादी समजला जातो. त्याचे शेजाऱ्याशी जमत नाही मग बाकीच्यांचा विचारच नको. त्याचा जो काही जमीन तुकडा असेल त्यावर त्याचे अपार प्रेम. त्या तुकड्याला जोपर्यंत धक्का लागत नाही तोपर्यंत बाहेर जगबुडी झाली तरी त्याची त्याला फारशी फिकीर नाही. या जमिनीच्या तुकड्याच्या

बळिचे राज्य येणार आहे / ३७८