पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/375

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 साधूनी बचनाग खाती तोळा। आणिकांते डोळा न पहावे।।
 साधूनी भुजंग धरितील हाती। आणिके कांपितो देखोनिया।।
 असाध्य ते साध्य करिता सायास। कारण अभ्यास तुका म्हणे।।
 विष पचवण्याची सिद्धी आणि साप पकडण्याची युक्ती यासद्धा प्रयत्नाने, अभ्यासाने साध्य करता येतात. मग शेतकऱ्यांची संघटनाच का अशक्य असावी ? विष पचवता येते पण शेतकऱ्यांमध्ये चैतन्य निर्माण करता येणार नाही? साप पकडता येईल; पण स्वतंत्र होण्यासाठी, उपासमार थांबवण्यासाठी, पोराबाळांना सुख दिसावे म्हणून शेतकरी त्वेषाने उठायचा नाही ?
 वन्हि तो चेतवावा रे चेतविताच चेतितो।
 केल्याने होत आहे रे आधि केलेची पाहिजे।।
 शेतकरी तितूका एक करणे, त्यांचा एकमेकांशी संबंध बांधणे, त्यांना संघटित करून, त्याला माणूस म्हणून जगता यावे यासाठी लढा तयार करणे ही कामे कठीण खरी पण अशक्य खास नव्हेत. त्यासाठी प्रयत्न करावे लागतील, अभ्यास लागेल, कठोर परिश्रम लागतील, सर्वस्वाचा त्याग करण्याची तयारी लागेल. कोणाच्याही लाभाची, पदाची अपेक्षा न ठेवता स्वत:ला प्रसंगी गाडून घेऊन संघटनेचे काम करणाऱ्या लाखो कार्यकर्त्यांची गरज पडेल. जागोजाग वेळोवेळी अपमान होतील. निराशेची सावटे येतील, वादळे येतील तरीदेखील आता शेतकरी एक झाल्याखेरीज राहणार नाही कारण ही काळाची गरज आहे.
 शेतकरी संघटनेचे रोप लावले आहे. त्याची फळे 'याची देही याची डोळा' पाहावयास मिळतील अशी आमची अपेक्षाही नाही; पण आमच्या पोराबाळांना नातवंडा-पतवंडांना तरी त्याची मधुर फळे चाखायला मिळावीत म्हणून हा प्रयत्न आहे.

 शेतकऱ्यांना संघटित करण्याचे प्रयत्न आजपर्यंत झाले नाहीत असे नाही. अनेक प्रयत्न झाले. इंग्रजांच्या अमलाखाली देशांत अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची बंडे उभी राहिली. सरदार वल्लभभाई पटेलांच्या नेतृत्वाखाली बार्डोली येथे शेतकऱ्यांनी यशस्वी लढा दिला. महात्मा गांधींनी चंपारण्याचा सत्याग्रह करून शेतकरी एकजूट करून दाखविली. स्वातंत्र्यानंतरच्या काळातसुद्धा शेतकरी अनेकवेळा बंड करून उठला आहे. काही ठराविक हेतूने, काही काळ, मर्यादित प्रदेशांतले शेतकरी तरी एकजूट करून उठू शकतात हे त्यांनी दाखवून दिलेले आहे. सर्व भारतात जागोजाग शेतकऱ्यातील असंतोषाची आग धुमसत

बळिचे राज्य येणार आहे / ३७७