पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/372

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कधीकाळी काय करेल तो मुद्दा बाजूला ठेवू; पण ज्या सरकारने आजपर्यंत आपल्याला लुटले त्याच सरकारच्या मेहेरबानीची वाट पाहत जगण्यापेक्षा आपण आपले कुटुंब, आपला शेतकरी समाज हा संघटित करण्याची आवश्यकता आहे असे जर मानले तर शेतकऱ्यांची मने खंबीर होतील आणि आत्महत्येसारखा क्षणिक दुर्बलतेचा प्रसंग ते टाळू शकतील.
 पूर्वीच्या काळी संध्याकाळच्या वेळी घरामधील सगळी माणसे एकत्र जमून काही प्रार्थना म्हणत. आजही अनेक गांधीपरिवारातील कुटुंबांत ही परंपरा चालू आहे. शेतकऱ्यांनी कोणत्या एका धर्मातील किंवा कोणत्या एक देवाची प्रार्थना करावी असे मी कधीही म्हणणार नाही. शेतकरी काही फक्त हिंदू नाहीत, ते कोणत्याही एका धर्माचे नाहीत; पण सगळ्या शेतकऱ्यांनी मिळून जर अशी प्रतिज्ञा केली की, "आम्ही बुडालो ते आमच्या चुकीमुळे नव्हे आणि या आक्रमणाला आम्ही सर्व मिळून एकत्र तोंड देऊ, खचून जाणार नाही" तर, मला असे वाटते की, शेतकऱ्यांना याही प्रसंगातून तगून जाण्याकरिता जे सामर्थ्य हवे ते मिळू शकेल.

(शेतकरी संघटक, २१ जुलै २००६)

बळिचे राज्य येणार आहे / ३७४