पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/371

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

वैफल्यात सापडलेल्या माणसाला मदत करणारे, धीर देणारे, सांत्वना करणारे कुटुंबातील अनेक सदस्य आजूबाजूला असतात.
 याउलट. चौकोनी कुटुंबात कोणाच्या मनाची घालमेल होऊ लागली. वैफल्यग्रस्तता येऊ लागली की सावरण्यासाठी, धीर देण्यासाठी, याकरिता स्थापन झालेल्या काही स्वयंसेवी संघटना सोडल्यास, कोणीच मिळत नाही. आत्महत्यांचे सर्वांत महत्त्वाचे जवळचे कारण कुटुंबाचा आधार मोडकळीस आलेला असणे हे आहे.
 याचा अर्थ, कर्जबाजारीपणापोटी शेतकरी आत्महत्या करीत नाहीत असे नाही; पण कर्जबाजारीपणामुळे लक्ष्मी घरातून गेल्यामुळे साहजिकच घरामध्ये गृहकलह होऊ लागतात, घरामध्ये फाटाफूट होऊ लागते. शेतकरी समाजात तर जमिनीच्या वाटणीवरून भावाभावांची डोकेफोडीपर्यंत भांडणे होतात.
 कुटुंबसंस्था मोडकळीस येणे हे ना श्रीमंतीचे लक्षण आहे, ना गरिबीचे लक्षण आहे. गडगंज श्रीमती असलेल्या घरात प्रचंड एकोपा आढळतो आणि अत्यंत गरिबी असलेल्या कुटुंबातही हा एकोपा आढळतो. गडगंज श्रीमंती असलेल्या घरात लोकांना सगळे सांभाळून नेण्याकरिता एकत्र राहण्याची प्रवृत्ती असते, काही काळतरी ती टिकते आणि गरीब घरात एकमेकांच्या गरजांपोटी एकोपा टिकवून ठेवण्याची इच्छा राहते.
 आत्महत्यांचे प्रमाण सर्वांत जास्त आढळते ते ना धड संपन्न, ना धड गरीब अशा मध्यम परिस्थितीतील शेतकऱ्यांमध्ये. त्यातही ज्या शेतकऱ्यांनी संपन्नता पाहिली आहे, संपन्नतेचा अनुभव घेतला आहे त्यांना कठीण दिवस आल्यानंतर परिस्थितीला तोंड देणे जास्त अवघड होते.
 शेतीमालाला भाव मिळाला नाही, आपण कर्जबाजारी झालो, समाजात आपली प्रतिष्ठा राहिली नाही, सन्मान राहिला नाही हे दु:ख ऊर जाळत असताना, 'पण, कुटुंब माझे आहे' ही भावना नष्ट होणे हे खरे दुर्दैव आहे. "मी कर्जबाजारी झालो ही काही माझी चूक नाही. जे संकट आले आहे ते बाहेरचे आहे. चोरांनी हल्ला केला म्हणून मी आत्महत्या करणे योग्य होणार नाही. सर्व कुटुंबाने मिळून या संकटाला तोंड दिले पाहिजे." अशी मनोवृत्ती जर बाळगली गेली, आपल्या कुटुंबाविषयी आपलेपण आणि अनुकंपा बाळगली गेली तर आत्महत्यांचे प्रमाण शेतीचे शोषण असतानाही कमी होऊ शकते.

 ज्या कुटुंबांना दारिद्र्यामुळे, कर्जबाजारीपणामुळे आपल्या घरातही आत्महत्येसारखा प्रकार होण्याची भीती वाटते आहे त्यांच्याकरिता सरकार

बळिचे राज्य येणार आहे / ३७३