पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/370

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

करण्याचा प्रयत्न केला. सासुसासऱ्याचा जाच होणाऱ्या सुनांच्या बाबतीतही असाच प्रकार आढळतो. एकदा एखाद्या वस्तीमध्ये, कॉलनीमध्ये एका सुनेने छळाला कंटाळून आत्महत्या केली की त्याच भागामध्ये असे प्रकार घडत राहतात. ही एक प्रकारची लागणच होते.
 असे का व्हावे? अडचणीत सापडलेला मनुष्य त्या अडचणीतून बाहेर कसे पडता येईल याचा विचार करतो. विचार करताना अधिक कष्ट करावे, मिळकत वाढवावी, अडचणी सोडवाव्या या दृष्टीने सारा विचार होतो. त्याच्या मनात मरणाला कवटाळावे अशी बुद्धी नैसर्गिकरीत्या होत नाही. असा विचार त्याच्या विषयपत्रिकेतही नसतो; परंतु आसपासच्या प्रदेशात समांतर परिस्थितीत सापडलेल्या कोणीतरी आपली जीवनयात्रा संपविण्याचा निर्णय केला असे उदाहरण घडले की मग त्यानंतर तशा परिस्थितीत सापडलेल्या सर्वांच्या मनात, निराशेच्या टोकाला गेल्यानंतर, आत्महत्या हा एक व्यावहारिक विकल्प म्हणून विषयपत्रिकेवर येतो. साहजिकच, आत्महत्या एकट्यादुकट्या होत नाहीत; आत्महत्यांची एक साथ असते.
 विदर्भातील शेतकऱ्यांमध्येही अशीच आत्महत्येची साथ पसरली आहे. गरिबीमध्ये आत्महत्यांचे प्रमाण कमी आणि संपन्न समाजात जास्त याचे आणखी एक महत्त्वाचे कारण आहे. गरीब कुटुंबात प्रत्येक जण गरजू असतो. तेथे आपल्याला कोणाची गरज नाही म्हणून उर्मटपणे वागण्याची प्रवृत्ती होत नाही. म्हाताऱ्या आई-बापांना का होईना, सांभाळून असावे अशी विचारसरणी तयार होते आणि त्यामुळे आपण, बायको, मुलेबाळे, आईबाप एवढेच नव्हे तर, काका-मामांनासुद्धा सांभाळून एकत्र राहण्याची प्रवृत्ती तयार होते. याउलट, संपन्न समाजात आपल्याला कोणाची गरज नाही, आपण कमावतो त्यात वाटेकरी जितके कमी होतील तितके जास्त चांगले अशा भावनेने संबंध तोडून आपले चौकोनी कुटुंब चालण्याची प्रवृत्ती जास्त दिसते.
 ही प्रवृत्ती प्रामुख्याने आत्महत्यांचे प्रमाण वाढविण्यास जबाबदार आहे. मानसशास्त्रज्ञांनी या विषयावर अनेक अभ्यास केले आहेत आणि त्यांनी निष्कर्ष काढला आहे की आत्महत्या करण्याची ऊर्मी ही क्षणिक असते. माणसाला एक क्षणभर आलेल्या विफलतेच्या भरात तो काय वाटेल ते करून जातो. तो क्षण जर का कोणत्याही कारणाने आणि कोणत्याही पद्धतीने टाळता आला तर आत्महत्या टळू शकते.

  एकत्रित कुटुंबात आत्मकेंद्री विचार करणे कठीणच होऊन जाते. त्याशिवाय,

बळिचे राज्य येणार आहे / ३७२