पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/369

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

माणसे याला उपभोगवादी समाजाची अनैतिकता हेच कारण असल्याचे सांगतात.
 भारतातही, अलीकडे कृषिमंत्र्यांनी संसदेत सादर केलेल्या आकडेवारीनुसार, ६० टक्के शेतकऱ्यात १६ टक्के आत्महत्या होतात तर ४० टक्के बिगरशेतकऱ्यात ८४ टक्के आत्महत्या होतात. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बिगरशेतकरी समाजात आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण सर्वांत जास्त नोकरदारांत आहे. बेरोजगारही आत्महत्या करतात आणि ज्यांना चांगली नोकरी मिळाली आहे अशी माणसेही आत्महत्या करतात.
 संपन्न समाजात आत्महत्या अधिक व्हाव्यात आणि कौटुंबिक व सामाजिक प्रश्न अधिक बिकट व्हावे यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. संपन्न समाजातील प्रत्येक व्यक्तीस अधिकाधिक संधी प्राप्त होतात आणि स्वातंत्र्याच्या कक्षा रुंदावत असताना प्रत्येक वेळी निवड आणि निर्णय करण्याच्या जबाबदारीने त्याच्यावर मानसिक ताण पडतो. जुन्या काळच्या साध्यासुध्या जीवनात निवड आणि निर्णय करण्याची शक्यता माणसांना फार थोडी मिळत असे. या निर्णय करण्याच्या प्रक्रियेत मानसिक ताण आहे. आपण केलेला निर्णय बरोबर आहे किंवा नाही याबद्दलची थोडी चिंता आहे. नंतर चुकीच्या शाबीत झालेल्या निर्णयांबद्दल खंत आहे. यामुळे, मानसिक तणाव अधिक वाढत जातात आणि त्यातूनच अमेरिकासदृश परिस्थिती तयार होऊ शकते.
 बिहार, उत्तर प्रदेश, ओरिसा यांसारख्या राज्यांत आत्महत्या होत नाहीत याचा अर्थ तेथील शेतकरी फार काही सुखी आहे असा नाही. खाण्याची भ्रांत असलेला बिहारमधील शेतकरी आत्महत्या करीत नाही याचा अर्थ तो मनाने मोठा खंबीर आहे असेही नाही. अगदी पराकोटीच्या अडचणीत सापडलेला बिहारमधील शेतकरी गुन्हेगारीकडे वळेल, मारायला तयार होईल, चोरी करायला तयार होईल, दरोडे घालायला तयार होईल; पण आत्महत्या करण्याकडे त्याची प्रवृत्ती होणार नाही. विदर्भातील संस्कृती प्राचीन काळापासून संयत संस्कृती म्हणून प्रसिद्ध आहे. विदर्भातील माणसे सौम्य आणि सज्जन असल्याबद्दल त्यांची प्रख्याती आहे. ही माणसे हिंसाचाराकडे वळून स्वत:ची तुंबडी भरण्याचा विचारही करणे शक्य नाही. त्यांच्यापुढे पर्याय राहतो तो केवळ स्वत:ची जीवनयात्रा संपविण्याचाच.

 आत्महत्यांची एक साथही असते. मंडल आयोगाच्या वेळी दिल्लीतील पाचदहा विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. एकाने आत्महत्या केल्याबरोबर दुसऱ्याने केली, तिसऱ्याने केली ह्न अशी दहा विद्यार्थ्यांनी एका पाठोपाठ आत्महत्या

बळिचे राज्य येणार आहे / ३७१