पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/368

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 या परिस्थितीचा फायदा काही मागास मनोवृत्तीचे लोक घेऊ पाहतात आणि "ज्या शेतकऱ्यांनी सुधारित शेती केली त्यांच्यामध्येच आत्महत्यांचे प्रमाण अधिक आहे. याउलट, जेथे मागास, पारंपरिक शेती चालू आहे तेथील शेतकरी संपन्न झाले नसले तरी आत्महत्येकडे ढकलले गेले नाहीत" असा युक्तिवाद करू पाहतात. नवीन तंत्रज्ञानामुळेच आत्महत्या आल्या आणि नवीन तंत्रज्ञानाला लागणाऱ्या खते व औषधे यांतील भेसळीमुळे त्यात भर पडली असाही या मागास मनोवृत्तीच्या लोकांचा युक्तिवाद आहे.
 आत्महत्यांच्या प्रमाणात भलीमोठी वाढ होण्याचे सांगितले जाणारे एक कारण मोठे विचित्र आहे. कर्जापोटी आत्महत्या केल्याचे सिद्ध झाले तर सरकार आत्महत्या करणाऱ्याच्या परिवारास लाखभर रुपये देते आणि त्यामुळे आपण मेलो तरी मिळालेल्या लाखभर रुपयांच्या नुकसानभरपाईमध्ये निदान कुटुंबतरी कर्जमुक्त होईल या भावनेने काही शेतकरी आत्महत्येला प्रवृत्त होतात असे म्हटले जाते. काही किरकोळ प्रकरणी तर परिवारातील नातेवाईकांनी अगदी म्हातारे होऊन कोपऱ्यात बसलेल्या परिवारातील एखाद्या माणसास बळेच विष पाजून ती आत्महत्या झाल्याचा गवगवा केला असेही सांगण्यात येते. खरेखोटे परमेश्वर जाणे.
 आत्महत्या करण्यास लोक प्रवृत्त का होतात? खरे म्हटले तर प्रत्येक माणसाची जगण्याची इच्छा तीव्र असते; जगण्यासाठीच सारी धडपड चालू असते. मग अचानक अशी काय परिस्थिती तयार होते की ज्यामुळे माणसाला जगण्याची धडपड सोडून देऊन आपली ही जीवनयात्रा संपवून टाकावी असे वाटू लागते?
 अमेरिकेसारख्या श्रीमंत देशांत आत्महत्यांचे प्रमाण जास्त आहे. त्याबरोबरच, तेथील कुटुंबव्यवस्था मोडकळीस आल्यामुळे घटस्फोटांचेही प्रमाण अधिक आहे. आई-बाप मुलगा कर्तासवरता झाला म्हणजे आपण त्याचे काही देणे लागतो असे मानित नाहीत; लग्न झाल्यानंतर मुलेही आईबापांस वृद्धाश्रमात ठेवून आपण आपले कर्तव्य केले असे समजतात. श्रीमंतीच्या या उन्मादात अनेकजण मादक द्रव्यांच्या सेवनाचेही व्यसनी बळी बनतात. त्याबरोबरच संपन्न देशांत आत्महत्यांचे प्रमाण अधिक आहे.

 हे असे का व्हावे? जर का माणसाची सगळी धडपड अधिकाधिक चांगले जगण्यासाठी आहे तर अधिक चांगले जगण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर माणसाला मरण्याची इच्छा अधिक प्रमाणात का व्हावी ? मागास मनोवृत्तीची

बळिचे राज्य येणार आहे / ३७०