पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/364

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

असे. विदर्भातले पाहुणे तेथील सुगंधी भाताच्या आणि लोणकढ्या तुपाच्या सुवासाची कथा पश्चिम महाराष्ट्रातील स्नेहीसंबंधींना मोठ्या रंगवून ऐकवत असत. विदर्भातील सासुरवाडी मिळणे पश्चिम महाराष्ट्रातील लोकाना भाग्योदय वाटे आणि विदर्भात मुलगी देणे हे पश्चिम महाराष्ट्रातील लोक मोठे प्रतिष्ठेचे मानीत. महाराष्ट्राशी इतिहासात कधीही संलग्न नसलेला विदर्भ प्रदेश; प्रभू रामचंद्राने संयत विद्वानांचा म्हणून सांगितलेला विदर्भ प्रदेश ; मध्यप्रांताची राजधानी नागपूर असलेल्या विदर्भाचा प्रदेश. कापसाचे पांढरे सोने, नागपुरी संत्री आणि लोखंड, मँगनीज, कोळसा अशा खनिजांनी संपन्न प्रदेश आज इतका ढासळला की तेथील शेतकऱ्यांना जगणे असह्य व्हावे? इतिहासाला ही कलाटणी मिळाली केव्हापासून ? याची तारीख स्पष्ट आहे.
 महाराष्ट्राचे स्वतंत्र राज्य तयार झाले तर त्यात काँग्रेसला सत्ता मिळणार नाही आणि मुंबईचा खजिना आणि महाराष्ट्राची प्रज्ञा विरोधकांच्या हाती जाईल या भीतीने पंडित नेहरूंनी विदर्भ प्रदेश बळेच महाराष्ट्रात ढकलला. विदर्भातील सर्व काँग्रेस नेत्यांनी या अपहरणाला संमती दिली. नागपूर कराराचा एक कागदाचा तुकडा तयार करून महाराष्ट्राने 'विदर्भ हरण' केले.
 कारखानदारीत आणि व्यापारात पुढारलेल्या महाराष्ट्राला कच्च्या मालाची संपदा निसर्गाने बहाल केलेला विदर्भ जोडला गेला आणि मग विदर्भावरील बलात्कार सुरू झाला. विदर्भातील पांढरे सोने लुटण्यासाठी कापूस एकाधिकार खरेदी योजना करण्यात आली. या योजनेचा मुख्य फायदा फक्त मुंबईचे गिरणीमालक आणि एकाधिकारातील ग्रेडर तसेच राज्यकर्त्या पक्षाच्या पुढाऱ्यांचा झाला. शेतकरी अक्षरशः पिळून निघाला.
 विदर्भाची जलसंपदा फार मोठी आहे; पण महाराष्ट्राच्या अंदाजपत्रकात सर्व पैसा कृष्णा खोऱ्यातील पाणीपुरवठा योजनांसाठी वापरला गेला. कृष्णा खोऱ्याचा विकास झाला नाही तर तेथील पाण्याचा हक्क महाराष्ट्र कायमचा गमवून बसेल असा धाक दाखवून विदर्भातील सर्व पाणीपुरवठ्याच्या योजनांना बगल देण्यात आली.
 विदर्भाच्या अनुशेषाचे आकडे हजारो कोटींचे झाले तरीही तो अनुशेष संपवण्यासाठी काहीही सज्जड प्रयत्न झाले नाहीत.

 तात्पर्य, विदर्भातील शेतकऱ्यांची शोकांतिका कापूस एकाधिकारातून निर्माण झाली आणि महाराष्ट्राने लादलेल्या अनुशेषाने झाली. विदर्भाच्या अपहरणास जबाबदार असलेल्या केंद्रीय आणि वैदर्भीय काँग्रेस नेत्यांना या जबाबदारीपासून

बळिचे राज्य येणार आहे / ३६६