पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/357

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

झाले आहे. कारणांचीही यादी बनवण्यात आली. आत्महत्यांच्या आकडेवारीसंबंधी असाच दुष्ट खेळ करण्यात आला. संसदेला दिलेल्या आकड्यानुसार एकट्या २००४ सालातच केवळ कर्नाटक राज्यातच ८००० च्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे मान्य करण्यात आले होते. तरीही, देशभरातील पंजाबपासून केरळपर्यंतच्या सर्व राज्यांतील आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या २५००० च्या आसपास सांगितली जात होती.
 फसवी आकडेवारी
 पुण्यामध्ये माथाडी कामगारांच्या एका सभेत बोलताना कृषिमंत्री शरद पवार यांनी 'शेतकऱ्यांच्या आत्महत्यांत नवे काहीच नाही, बऱ्याच काळापासून या आत्महत्या चालूच आहेत व त्यांचे प्रमाणही फारसे वाढलेले नाही' असे आग्रहाने मांडले. आपल्या विधानाच्या पुष्ट्यर्थ त्यांनी गृहमंत्रालयाने संपादन केलेली आकडेवारी पुढे ठेवली. या आकडेवारीनुसार १९९५ सालापासून दरवर्षी देशात घडणाऱ्या एकूण आत्महत्यापैकी १४ ते १६ टक्के आत्महत्या शेतकऱ्याच्या खात्यावर जमा असतात असे मोठ्या पंडिती आविर्भावाने त्यांनी मांडले. त्यांनी दिलेली आकडेवारी अविश्वसनीय होती हे उघड होते. देशात ६०% लोक शेतकरी आहेत. त्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण एकूण आत्महत्यांच्या १६ टक्के आहे व देशातील ४० % बिगर शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण एकूण आत्महत्यांत ८४ % आहे असे मांडणे हा निव्वळ बाष्कळपणा आहे. शेतीशी दुरान्वयेही संबंध असलेल्या माणसाने अशा आकडेवारीचा कागद क्षणभरसुद्धा हातात धरायला नको होता अशी आकडेवारी पवार साहेबांना विश्वसनीय वाटली; एवढेच नव्हे तर, ती त्यांनी लोकसभेत मांडली. याबद्दल, खरे तर त्यांच्यावर हक्कभंगाची कारवाई व्हायला हवी होती.
 बिगर शेतकऱ्यांच्या आत्महत्या शहरी भागातील पोलिस कटाक्षाने नोंदतात. याउलट, खेड्यापाड्यात झालेल्या अनेक आत्महत्या नोंदल्याच जात नाहीत. तेव्हा, गृहखात्याकडे जमा झालेली आकडेवारी खल्लड आहे हे उघड आहे. शिवाय, आत्महत्या करणारे शेतकरी जमीनमालक आहेत. भूमिहीनांपैकी फारसे कुणी आत्महत्या केल्याची नोंद नाही. तेव्हा १६% आत्महत्या देशातील ६ ते ८ टक्के शेतजमीनधारक करतात आणि ही परिस्थिती भयावह आहे हे शेतीमंत्र्यांनी समजून घ्यायला हवे होते व स्पष्ट करायला पाहिजे होते. 'मोलें घातले रडया, नाही आंसू आणि माया' असा हा सगळा प्रकार आहे.

 चोरांच्या बोंबा

बळिचे राज्य येणार आहे / ३५९