पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/354

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

लागले नाही; पण यंदाचा दुष्काळ त्यांच्यासाठी वज्रघातासारखा ठरला. त्यात लहरी पावसाने त्यांच्या दोनदोन पेरण्या वाया घालवल्या - आजपर्यंत अशा परिस्थितीला तोंड देण्याची त्यांच्यावर कधी वेळ आली नव्हती.

 मोसमी पावसाच्या आगमनाच्या कितीतरी आधी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सहकारी पतसंस्था तसेच अन्य कर्जपुरवठा संस्थांच्या वसुली अधिकाऱ्यांनी त्यांच्या वसुली मोहिमा सुरू केल्या होत्या. त्यात समजुतीने कर्जफेड करण्यास प्रवृत्त करणे, धमक्या देणे, मानखंडना करणे, राहत्या घरातील भांडीकुंडी, पंखे, सायकली, घरावरील पत्रे जप्त करणे तसेच जमिनींचे लिलाव करणे अशा मार्गांचा ते अवलंब करीत होते. यावर्षी वसुलीची मोहीम राबवताना वसुली अधिकारी विशेष कठोर आणि निष्ठूर बनले होते. २००३-२००४ हे वर्ष विदर्भातील कापूस उत्पादकांसाठी विशेष चांगले गेले होते. एक म्हणजे कपाशीचे पीक भरघोस आले होते आणि महाराष्ट्र राज्य एकाधिकार कापूस खरेदी योजनेचा कारभार स्थगित राहून खासगी व्यापाऱ्यांना कापूस विकण्याची मुभा मिळाल्यामुळे कापसाला भावही चांगले मिळाले. सोयाबीनच्या बाबतीतही तेच घडले. फारा वर्षांनी शेतकऱ्यांच्या हाती नेहमीपेक्षा कितीतरी अधिक पैसा आला. कर्जपुरवठा करणाऱ्या बँका, सहकारी सोसायट्या, राष्ट्रीयीकृत बँका यांना आणि खासगी सावकारांनाही त्याचा वास लगेच आला. वसुली करून कर्जखाती 'निल' करण्यास आणि हिशोब पुरे करण्यास ही नामी संधी आहे आणि ती दवडता नये असा त्यांनी निश्चय केला. परिणामी, वसुलीची तऱ्हा शोषणाच्या पातळीपर्यंत कठोर आणि सक्तीची बनली. बँकेच्या अधिकाऱ्यांनी तर शेतकऱ्यांच्या राहत्या घरात दरवाजाची कुलुपे तोडून जे जे हाताला लागेल ते वसुलीच्या नावाने उचलायला सुरुवात केली. अनेक प्रकरणात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वसुली अधिकाऱ्यांच्या या भुरटेपणाला अटकाव केला. काही बाबींत तर वसुली अधिकाऱ्यांविरुद्ध पोलिसांत घरफोडी आणि दरोडेखोरीचे खटलेही नोंदविले. एका गावात तर वसुली अधिकाऱ्यांनी फोडलेल्या घरातून टेम्पोत भरलेला माल, शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पोलिस खटल्याचा धाक दाखवताच, अधिकाऱ्यांनी पाट्या भरभरून डोक्यावरून वाहून पुन्हा त्या घरात नेऊन ठेवला. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचे आणि शेतकऱ्यांचे हे विरोधाचे प्रयत्न, प्रस्थापित सत्तेच्या ताकदीपुढे अरण्यरुदनच ठरले. वसुली अधिकाऱ्यांचे गाढवांचे नांगर गावागावात बेमूर्वतपणे फिरतच राहिले.

बळिचे राज्य येणार आहे / ३५६