पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/352

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


यवतमाळचे दुखणे



 हाराष्ट्राच्या विदर्भ विभागात निसर्गाचे अफाट देणे लाभलेल्या जिल्ह्यांपैकी यवतमाळ हा एक जिल्हा आहे. विपुल पर्जन्यवृष्टीच्या कृपेने या जिल्ह्यातील बरेच भूभाग हिरव्यागर्द वनराईने नटलेले आहेत. यवतमाळ हा महत्त्वाचा कापूस उत्पादक जिल्हा आहे. इतका महत्त्वाचा की ब्रिटिश राजवटीत ब्रिटिश कंपन्यांनी मोठा खर्च करून कापसाच्या वाहतुकीसाठी जिल्ह्यातून स्वतंत्र रेल्वेमार्ग तयार केले. रस्ते आणि जंगले यांतून नागमोडी वाटा काढीत हा मीटरगेज रेल्वेमार्ग अख्ख्या जिल्हाभर फिरला आहे. स्वातंत्र्याच्या उदयकाळी यवतमाळ जिल्ह्याच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय जीवनावर 'इजारदारां'चा पगडा होता. 'इजारदार' याचा शब्दश: अर्थ 'जो इजार म्हणजे पँटपायजमा घालू शकतो' असा. व्यवहारात त्याचा अर्थ तीनशे ते पाचशे एकराच्या आसपास जमीन बाळगणारा छोटा जमीनदार. उदार समृद्ध निसर्गाच्या कृपेने या इजारदारांचा वर्ग संपन्न जीवन जगत होता. अवर्षण, उपासमार यांच्याशी त्यांची गाठ कधी पडली नाही.

 आज स्वातंत्र्यानंतर पंचावन्न वर्षांनंतर, यवतमाळचे चित्र पूर्णपणे पालटून गेले आहे. अधिकृत सरकारी आकडेवारीनुसार २००१ सालापासून या जिल्ह्यातील १५४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत - २००१ मध्ये १७, २००२ मध्ये ३८, २००३ मध्ये ५२ आणि २००४ मध्ये जुलै महिनाअखेर ४७. आत्महत्या करणाऱ्या या १५४ शेतकऱ्यांपैकी ९ जणांचा अपवाद वगळता सर्वच्या सर्व शेतकरी वेगवेगळ्या कर्जपुरवठा संस्था किंवा सावकार यांच्याकडून घेतलेल्या कर्जाच्या बोजाखाली होते. थकित कर्जाच्या रकमा सर्वसाधारणपणे पाच आकडी होत्या ; ज्यांची शेतीमालाची उलाढाल बहुतेकदा सहा आकडी रकमेत व्हायची त्यांच्या दृष्टीने हा कर्जाचा बोजा 'अगदी असह्य' या सदरात नक्कीच

बळिचे राज्य येणार आहे / ३५४